टांगेवाले वसाहतीत चंद्रकांतदादांना रोषाचा फटका; प्रचाराला आलात का? पुणेकरांचा सवाल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरणेश्वर येथील टांगेवाले वसाहत पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री चंदकांत पाटील यांना संतप्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. केवळ या ठिकाणी प्रचारासाठी आलात का? फोटो काढण्यासाठी आलात का? असा आरोप नागरिकांनी केला.

पुण्यात बुधवारी रात्री पावसाने कहर केला. त्यामध्ये टांगेवाले वसाहत येथे आंबिल ओढय़ाला आलेल्या पुरामुळे भिंत पडून पाचजणांचा मृत्यू झाला, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झाले आहेत. वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा वेळी पालकमंत्री पाटील यांनी पुण्यात धाव घेऊन पूरस्थितीची पाहणी करून प्रशासनाला योग्य सूचना देणे अपेक्षित होते, मात्र त्याऐवजी पाटील दिल्लीला गेले होते. सरकारी यंत्रणा मदतीसाठी उशिरा आली त्याची संतप्त प्रतिकिया आज उमटली.

 पालकमंत्री चंदकांत पाटील यांनी आज पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी महापौर मुक्ता टिळक, स्थानिक आमदार माधुरी मिसाळ, भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. या वेळी संतप्त नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘पाटील निघून जा’ अशा घोषणा देत, ते केवळ या ठिकाणी फोटो काढण्यासाठी आले आहेत असा आरोप नागरिकांनी केला. पाटील यांच्या सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप नागरिकांनी केला.

राजकारणासाठी असे प्रकार घडवून आणतात
काही लोक राजकारणासाठी असे प्रकार घडवून आणतात. पण हे राजकारण करण्याची वेळ नाही, तर खांद्याला खांदा लावून लढण्याची वेळ आहे असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

दुसऱ्या रस्त्याने बाहेर काढले
चंद्रकांत पाटील यांनी सध्या आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे मला तुमच्या सर्वांसमोर आर्थिक मदत जाहीर करता येणार नाही. मृतांच्या वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मदत देण्यात येईल. तसेच पुनर्वसनासंदर्भात देखील निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे स्पष्ट करत नागरिकांचा रोष शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही पुणेकर शांत झाले नाहीत. तेव्हा अखेर भाजप कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून दादांना दुसऱ्या रस्त्याने बाहेर काढले.