चंद्रकांत पाटलांनी भान ठेवावे शिवसेनेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी सरकारला खूश करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे आघाडी सरकारवर टीका करीत आहेत. मात्र, आघाडी सरकारबाबत महाराष्ट्राची जनताच ठरवेल, यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, याचे चंद्रकांत पाटील यांनी भान ठेवावे, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी दिला.

भाजपच्या रक्तातच विश्वासघात असून, महाराष्ट्रासह देशभरात सत्तेसाठी ते अनेकांचा घात करीत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या पायगुणाने भाजप संपत चालला आहे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बेताल बडबड केल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरून धडा शिकवतील, असा इशारा संजय पवार व विजय देवणे यांनी दिला. यावेळी सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, मंजित माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापूर व कोरोनाकाळात केलेले काम जनतेला माहिती आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या सरकारमध्ये काय दिवे लावले हे लोकांना माहीत आहे. राज्य अडचणीत असताना भाजप राजकारण करीत आहेत. हे महाराष्ट्र बघत आहे. त्यामुळे तुम्हाला जनता माफ करणार नाही, असे पवार आणि देवणे म्हणाले.