
रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला फरार असतानाच्या काळात हैदराबाद येथे मदत करणारा जनार्दन अकुला चंद्रप्पा व त्याचे वकील सुनावणीस सतत गैरहजर राहत आहेत. त्यामुळे न्यायालयाने चंद्रप्पा याच्याविरुद्ध पकड वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची सुनावणी आता 3 नोव्हेंबरला होणार आहे.
रेखा जरे खून खटल्यातील सर्व 12 आरोपींविरुद्ध आरोप निश्चितीची प्रक्रिया प्रलंबित आहे. तसेच, आरोपी शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चाकाली व अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ या तिघांनी जरे खून खटल्याशी संबंध नसल्याचा दावा करत या खटल्यातून वगळण्याची मागणीही केली आहे. मात्र, या खटल्याच्या सुनावणीला या आरोपींपैकी कोणीही वा त्यांचे वकीलही हजर राहत नसल्याने आरोप निश्चितीची प्रक्रिया लांबणीवर पडत आहे.
मंगळवारी झालेल्या सुनावणीस केवळ नगरमधील आरोपी महेश तनपुरे उपस्थित होता. त्यामुळे न्यायालयाने चंद्रप्पाविरुद्ध पकड वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले. तसेच ज्या तीन आरोपींनी खटल्यातून वगळण्याची मागणी केली, त्यांना युक्तिवादासाठी शेवटची संधी म्हणून 3 नोव्हेंबरला सुनावणी निश्चित केली आहे. या दिवशी या तिघांनी त्यांना या खटल्यातून का वगळावे, याबाबत युक्तिवाद केला नाही तर त्यांचा अर्ज फेटाळण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे.






























































