चंद्रपूर – मोबाईलसाठी मुलाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

वडिलांनी मोबाईल बघू दिला नाही, या कारणाने एका अल्पवयीन मुलाने अपहरणाचा बनाव केला. चंद्रपूर शहरातील एका अकरा वर्षाच्या मुलाला मोबाईलचे प्रचंड वेड. नेहमीप्रमाणे तो मोबाईलवर गेम खेळत होता. त्यामुळे वडील त्याला रागवले. त्याचा राग त्याने मनात ठेवला. शाळेत जात असतानाच त्याने स्वतःच्या अपहरणाचा डाव रचला.

‘काही लोकांनी पेढा खायला दिला. मी तो खाल्ला नाही. त्यामुळे त्या लोकांनी तोंडावर रुमाल बांधून मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला’, अशी कहाणी त्याने शाळेत सांगितली. शाळेतून त्याच्या घरी संपर्क साधण्यात आला. त्याचे वडील शाळेत आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत मुलाने दाखविलेल्या जागेवरील सीसीटीव्ही फुटेज बघितले. मात्र त्यात असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे दिसून आले.

काही वेळाने पोलिसांनी मुलाला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर त्याने खरी हकीकत सांगितली. मोबाईल बघू दिला नसल्याने आणि मला शाळेत जायचे नव्हते या कारणाने आपण असा बनाव केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.