चंद्रपूर जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला यश, काँग्रेसची मुसंडी

चंद्रपूर जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली आहे. चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या तब्बल 13 वर्षानंतर झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवले. एकूण 21 संचालक असलेल्या या बँकेवर काँग्रेसचे 12 संचालक निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रत्येकी एक संचालक निवडून आला. यामुळे महाविकास आघाडीकडे 14 संचालक झाले असून, उर्वरित सात संचालक भाजपचे निवडून आले. सध्या बहुमतासाठी 11 सदस्यांची गरज असून, हा आकडा आघाडीकडे आहे. यामुळे बँकेचा होणारा अध्यक्ष काँग्रेसचा असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर हे एकमेकांचे विरोधक एकत्र आले. यांच्या एकत्र येण्याचा फायदा काँग्रेसला झाल्याचे बघायला मिळत आहे. खासदार धानोरकर या निवडणुकीत अविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे अध्यक्ष कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.