चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेची सुरुवात

शनिवार, 16 जानेवारी 2021. कोरोना लसीकरणाचा ऐतिहासिक दिवस. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 19 हजाराकडे वाटचाल करत आहे. सोबतच सुमारे 380 मृत्यूदेखील झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीची आतुरतेने वाट बघितली जात होती. 2 मे 2020 रोजी जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित आढळून आला होता. त्यानंतर ही संख्या झपाट्याने वाढत गेली. आज कोरोना लस प्रत्यक्ष वैद्यकीय अधिकारी- डॉक्टर आणि स्टाफ नर्सेस यांना शासकीय उपलब्ध डेटानुसार देण्याचा प्रारंभ केला गेला.

यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लसीकरण प्रतीक्षा कक्ष- लसीकरण कक्ष- आणि प्रत्यक्ष लसीकरण झाल्यानंतर निरीक्षण कक्ष अशा पद्धतीने या लसीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांनी पहिली लस टोचून घेत या लसीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ केला. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आजच्या दिवशी 6 लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी शंभर अशारीतीने 600 कोरोना योद्ध्यांना लसीकरण केले जाणार आहे.

जिल्ह्यात 20 हजार लसींचा साठा उपलब्ध झाला असून, आवश्यकतेनुसार आणखी लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही लस घेतल्यानंतर गेले अनेक महिने चंद्रपूरकर डॉक्टर्स -नर्सेस आणि आरोग्य विभागाच्या कर्मचारी -अधिकाऱ्यांनी केलेले अथक परिश्रम आठवत आहेत, अशी प्रतिक्रिया लाभार्थी डॉक्टर सोनारकर यांनी व्यक्त केली. आजच्या दिवसाचा अभिमान वाटतो आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहे.

आपली प्रतिक्रिया द्या