चंद्रपूर महापौर चषक पत्रिकेत प्रोटोकॉलवरून वाद, प्रकरण पोलिसात जाणार

701
chandrapur-mayor

चंद्रपुरात महापालिकेच्या वतीनं आयोजित महापौर चषकाचा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कुठलाही राजशिष्टाचार पाळण्यात आला नाही. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना नाव टाकण्यासंदर्भात विचारणाही करण्यात आली नाही. हाच धागा पकडून पालकमंत्र्यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे महापौर चषकात आता प्रोटोकॉलची लढत पाहायला मिळणार आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने महापौर कुस्ती चषक 2020 चे आयोजन केले आहे. शनिवारी म्हणजे उद्या 15 फेब्रुवारी रोजी चषकाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेच्या वादावरून संपूर्ण चषकावर प्रोटोकॉलचे संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उद्घाटनाचा मान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा असताना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना देण्यात आला आहे. त्यामुळे संतापलेल्या पालकमंत्र्यांनी थेट महापौरांवर एफआयआर दाखल करण्याची भूमिका घेतली आहे.

‘मला न विचारता पत्रिकेत नाव टाकण्यात आले आहे. तेही दुय्यमस्थानी. जनमानसात माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक कट रचण्यात आला आहे. त्यामुळे महापौर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत’, असं वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे.

मनपा आयुक्त संजय काकडे यांनी आपण राजशिष्टाचारानुसार फायनल केलेली पत्रिका मंजूर न करता महापौरांनी स्वत:च्या मर्जीने पत्रिका तयार केली, असे सांगितले आहे. 15 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्घाटक म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, अध्यक्षस्थानी सुधीर मुनगंटीवार, तर प्रमुख उपस्थिती म्हणून पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार बाळू धानोरकर, महापौर राखी कंचर्लावार, आमदार नागो गाणार, आमदार अनिल सोले, आमदार रामदास आंबटकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार आदींची नावं आहेत. प्रोटोकॉलनुसार उद्घाटक म्हणून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना मान मिळणे बंधनकारक आहे. मात्र, केवळ आपल्या पक्षातील नेत्यांना खूष करण्यासाठी हा मान हंसराज अहीर यांना देण्यात आला आहे. मूळात ही निमंत्रण पत्रिका प्रोटोकॉलनुसार नाही. पालकमंत्र्यांना उद्घाटनाचा मान देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पालकमंत्री याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे शहरवासींचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात महापौर राखी कंचर्लावार यांनी पत्रिका पूर्ण प्रोटोकॉलनुसार असल्याचं सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या