चंद्रपूर महानगरपालिकेचे कचरा संकलन कंत्राट वादग्रस्त ठरले आहे. स्वयंभू नामक कंपनीला आधीचे कंत्राट रद्द करून जास्त दरात हे कंत्राट मंजूर करण्यात आले. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. यावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संबंधी आपल्याकडे तक्रार प्राप्त झाली असून याबाबत लवकरच चौकशी करण्यात येईल तसेच जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे कचरा संकलन घोटाळा प्रकरण
पूर्वीच्या कंपनीचा कंत्राट कालावधी पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात कचरा संकलनाच्या संबंधात निविदा मागविण्यात आल्या. यामध्ये 6 पैकी दोन कंपन्या तांत्रिक दृष्टीने बाद झाल्याने चार कंपन्या पात्र ठरल्या. यामध्ये पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीने सर्वात कमी म्हणजे 1700 रुपये प्रति टन कचरा यानुसार किंमत लावली.
कंपनीने सर्व आर्थिक गणित जुळवूनच ह्या कंत्राटाची निविदा भरली. मात्र इतक्या कमी किमतीत हे काम होऊ शकत नाही हे कंपनीच्या आधी स्थायी समितीला कळलं. त्यामुळे समितीनेच ही निविदा रद्द केली. यानंतर पुन्हा ऑक्टोबर महिन्यात नव्याने निविदा मागविण्यात आल्या. यात स्वयंभू कंपनीला 2500 रुपये प्रतिटन याप्रमाणे कचरा संकलनाचे कंत्राट देण्याला मंजुरी देण्यात आली.
कचरा संकलनाची अद्यावत सुविधा आणि कामगार कायद्यानुसार कामगारांचे वेतन ह्या बाबी समोर ठेऊनच निविदा मागविण्यात आल्या. मग ह्याचे आर्थिक गणित जमवूनच स्वयंभू कंपनीने 1700 रुपये प्रतिटन याप्रमाणे निविदा भरली असं म्हणायला वाव आहे. तसेच निविदा प्राप्त झाल्यावर निविदा सादर करणाऱ्या कंपन्यांसोबत बैठक घेतली जाते ज्याला ‘प्रीबीड मिटिंग’ असे म्हणतात.
या बैठकीत आयुक्त आणि संबंधित विभागाचे प्रमुख असतात. यावेळी कंत्राट संबंधी अनेक तांत्रिक बाबींवर चर्चा होते. याही वेळी ही बाब कंपनीच्या लक्षात आली नाही का, हा देखील प्रश्न आहे. स्वयंभू कंपनीने हा प्रताप केल्यावर पून्हा निविदा मागविण्यात आल्या. पैसे देऊन याची जाहिरातबाजी करावी लागली. यात दोन महिन्यांचा वेळ वाया गेला. मागच्या कंपनीला दोन महिन्याचे कंत्राट वाढवून देण्यात आले, त्यात मनपाच्या पैशाचा नाहक अपव्यय झाला. अशावेळी कंपनीला वगळता आले असते. मात्र, याच स्वयंभू कंपनीला पुन्हा संधी देण्यात आली. आणि यावेळी 2500 प्रमाणे त्यांना काम देण्यात आले. त्यामुळेच या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप करण्यात आला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी याबाबतची तक्रार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करण्याची मागणी शिवसेने कडून केली गेली. आज नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे चंद्रपूरात पक्षाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून याची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ह्या कचरा संकलनाचे कंत्राट भविष्यात चांगलेच गाजणार आहे.























































