
हातावर पोट असणाऱ्या एका तरुणाला आयकर विभागाने चक्क कोट्यवधी रुपयांची नोटीस पाठवली आहे. दिवाकर कुकुडकर असे या तरुणाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी तालुक्यातील धाबा येथील रहिवासी आहे. नोटीस मिळाल्यापासून त्याची झोप उडाली असून स्वत: निर्दोष सिद्ध करण्यासाठी आयकर विभागापासून पोलिसांपर्यंत उंबरठे झिजवावे लागत आहे.
दिवाकर कुकुडकर हा तरुण चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी तालुक्यातील धाबा येथील रहिवासी आहे. पाच वर्षांपूर्वी त्याचे शैक्षणिक कागदपत्र हरवली होती. याबाबत त्याने पोलिसात तक्रारही दाखल केली. त्यानंतर तो गुजरातमधील भावनगर येथे कामाच्या शोधात गेला. तिचे त्याला केएफसी पिझ्झा हटमध्ये काम मिळाले. गेल्यावर्षी तो यवतमाळ येथे आला आणि तिथे डॉमिनोझच्या एका दुकानामध्ये तो काम करू लागला.
सर्वकाही सुरळीत सुरू असताना मार्च महिन्यात त्याला आयकर विभागाकडून एक नोटीस मिळाली. नोटीसमध्ये नक्की काय आहे हे त्याला आधी कळाले नाही. मात्र जाणकारांकडून माहिती घेतली तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्याला आयकर विभागाने चक्क 15 कोटी 48 लाख रुपयांची नोटीस पाठवली होती. हातावर पोट असलेल्या दिवाकरने याबाबत आयकर विभागाशीही संपर्क साधला आणि वास्तव सांगितले. मात्र आयकर विभागाकडून सकारात्मक उत्रत मिळाले नाही.
दिवाकर याच्या नावावर शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी दाखवण्यात आली असून जीएसटी नोंदणीही करण्यात आल्याची माहिती त्याला आयकर विभागाकडून मिळाली. यामुळे तो चक्रावून गेला. त्याने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदनही दिले आहे. आता याबाबत काय निर्णय होते आणि आयकर विभाग काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र यात बराच काळ जात असून आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी दिवाकरचे श्रम, पैसे आणि वेळही वाया जात आहेत.




























































