Video – चंद्रपुरात मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, पोलिसांकडून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यभरात शाळा सुरू झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील तुकूम गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक भाऊराव तुमडे यांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले.

शाळेचा पहिला दिवस असल्याने या शाळेत फक्त काही विद्यार्थी-विद्यार्थिनी पोहचले होते. पीडित विद्यार्थीनी इयत्ता पाचवीत शिकते. मुख्याध्यापकाने वर्गातील इतर मुलांना साफसफाईसाठी बाहेर पाठविले. आणि त्या आदिवासी मुलीच्या विनयभंग केला. पीडित मुलीने ही माहिती आधी मैत्रिणींना सांगितली व त्यांनी पालकांना माहिती दिली. माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी शाळेत येऊन मुख्याध्यापक तुमडे यांना खोलीत बंद करून पोलिसांनाकडे तक्रार केली. पंचायत समिती बल्लारपूरचे गटशिक्षण अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांनी घटनास्थळ गाठले.
बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहून कारवाई केली आणि जमावाला हुसकावून लावले. बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शाळेतील 7 विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापकाला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करत अटक केली आहे. पोलीस पोहोचल्याने या गावात मोठा अनर्थ टळला. या संतापजनक घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करत आहेत.