
सततच्या नापिकीला कंटाळून कीटकनाशक प्राशन करत शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील पाचगाव मध्ये समोर आली. घरी कुणीच नसल्याने घरीच कीटकनाशक प्राशन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कमलाकर भेंडे (६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मागील काही वर्षातील पावसाची अनियमितता, वाढलेला उत्पादन खर्च आणि अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घटनेची पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

























































