दुर्मिळ टेंभरणी फळ आली बाजारात ; या रानमेव्याला मोठी मागणी, दिवसेदिवस होत आहे दुर्मिळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभिषेक भटपल्लीवार

हिवाळा संपत असताना अन उन्हाळ्याच्या सुरुवातीला फारच चविष्ट असलेली टेंभरणी फळं बाजारात दिसू लागली आहेत. या फळाला टेंम्बर असं ही म्हटलं जातं, फळापेक्षा टेंभरणीचे झाड बिडीच्या वापरासाठी अधिक ओळखलं जातं. मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असलेले टेंभरणी फळ दुर्मिळ होत चाललं आहे.

सध्या चंद्रपूर बसस्थानकावर ग्रामीण भागातील नागरिक हे फळ विकायला आणत आहेत. हे दुर्मिळ फळ दिसताच या फळाची चव चाखण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. जंगलात असलेल्या गावातील मजुरांसाठी काही दिवस टेंभरणी फळ रोजगाराच साधन ठरत असते. घनदाट जंगलातून ही फळे तोडून आणली जातात. ही फळे घरी पिकविली जातात. कच्ची असताना हिरव्या रंगाची ही फळं पिकल्यावर केसरी रंगाची होतात. खायला गोड असलेली ही फळं 30 रुपये पायलीने विकली जात आहेत. विशेष म्हणजे या टेंभरणी फळातील पोषणमूल्याची प्रयोग शाळेत तपासणी करण्यात आली होती. या फळात ” अ ” जीवसत्व, झिंक व मॅग्नेशियम यांचे चांगले प्रमाण असल्याचं आढळून आलं होतं.