
>> चंद्रसेन टिळेकर
विज्ञान युगात ज्ञात होऊनही जेव्हा मंडळी चमत्कार करणाऱ्या बाबाला, मातेला शरण जाऊन गुरुपदी बसवतात तेव्हा आश्चर्य वाटते. फसव्या अन् वांझोटय़ा व्यक्तिपूजेला आपण जेवढय़ा लवकर तिलांजली देऊ तेवढे आपले, आपल्या समाजाचे अन् पर्यायाने आपल्या देशाचे भले होईल.
अंधश्रद्धेवर बोलताना वाढत्या बुवाबाजीवर बोलावेच लागेल. या विषयावर बोलताना अनेकदा मला विचित्र अनुभव आले आहेत. आजचा जो किस्सा सांगतोय, तो प्रत्यक्षात घडलेला आहे. अंधश्रद्धा हा विषय माझ्या आवडीचा असल्याने जिथे संधी मिळेल तिथे मी बोलतो.
काही वर्षांपूर्वी असाच मी पार्ल्यातल्या एका खासगी शिकवणी वर्गात या विषयावर बोलायला गेलो होतो. हा वर्ग हस्तकला शिकवण्याचा होता. त्यामुळे फक्त महिलांनाच तिथे प्रवेश होता व पन्नास महिला त्या वर्गात होत्या. विशेष म्हणजे विशी ते पन्नाशीपर्यंतच्या वयोगटातील महिला तिथे होत्या. नेहमीप्रमाणे मी भाषणाच्या सुरुवातीला श्रद्धा-अंधश्रद्धा यातील फरक, शकुन-अपशकुन, शुभ-अशुभ, दैवी शक्ती आणि सिद्धी, दुष्ट शक्ती आणि करणी, घरात समृद्धी आणणारी बनावट यंत्रं (ज्यांच्यावर आता संभाजीनगर उच्च न्यायालयाने बंदी आणली आहे), अंगठीतले निष्फळ खडे… इत्यादी अनिष्ट बाबींवर बोललो. स्त्रियांच्या दृष्टीनेही हे विषय महत्त्वाचे असल्याने सर्वजणी शांतपणे ऐकून घेत होत्या. शेवटी मी ‘बुवाबाजी’ या विषयावर बोलायला सुरुवात केली. अनेक बाबांची प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नावे घेऊन ते कसे भक्तांना ठकवतात, विशेषत स्त्रियांचे शोषण कसे करतात ते सांगू लागलो. नेहमीप्रमाणे शेवटी एक बाबा हातचलाखी करून कसे सोन्याचे हार, अंगठी, किमती घडय़ाळे काढतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवून जवळ जवळ सर्व क्षेत्रांतील नामांकित व्यक्ती त्याच्या पायावर कसे डोके ठेवतात ते सविस्तरपणे सांगितले. आधी मी मुद्दामच त्या बाबाचे नाव सांगितले नव्हते, पण श्रोतृवर्गाला अंदाज आल्याचे दिसत होते. शेवटी त्या बाबाचे नाव सांगितले. मात्र, मला त्या वर्गाच्या एका कोपऱ्यातून हुंदक्यांवर हुंदके ऐकू येऊ लागले. मी तर गोंधळातच पडलो. नेमके काय प्रकरण आहे कळेना. मी बोलायचा थांबलो आणि कोण रडतंय असे विचारले तसे एक महिला म्हणाली,
‘’सर, ही माझ्या बाजूला बसलेली मुलगी रडतेय.”
मी त्या मुलीला उभे राहायला सांगितले आणि समजुतीच्या स्वरात विचारलं, ‘’काय झालं मुली रडायला” तशी ती मुलगी रडत रडतच मला म्हणाली, ‘’सर, तुम्ही आमच्या बाबांबद्दल असं बोलू नका. ते देवमाणूस आहेत. त्यांची भक्ती करायला लागल्यापासून आमची आर्थिक परिस्थिती सुधारली. आमचे कुटुंब सुखी झाले. बाबांच्या अंगात दैवी शक्ती असल्याशिवाय असे झाले का?”
अंधश्रद्धेच्या संदर्भात बोलताना हटकून बुवाबाजीवर बोलावेच लागते आणि त्यावेळीही अनेकदा अशा प्रकारचे प्रसंग उद्भवले होते. आपल्या समाजात भाविक मंडळींचे आपापले बाबा, महाराज, बुवा, माता ठरलेल्या असतात आणि त्यांनी त्यांच्या चरणी आपल्या सगळ्या निष्ठा आपल्या विचारशक्तीसह वाहिलेल्या असतात. त्यामुळे इतर कोणत्याही बाबा-महाराजांच्या विरोधात काही बोलले तर ते मनावर घेत नाहीत, परंतु जर त्यांच्या बाबा-बुवाचे नाव घेतले तर ही मंडळी चवताळून उठतात. हे असं होतं याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या समाजात ‘गुरु’स्थानी मानल्या गेलेल्या व्यक्तीचे केले गेलेले अमाप उदात्तीकरण! त्यामुळे गुरू सांगेल ती पूर्व दिशा असते. गुरू म्हणजे देवाचेच रूप मानले जाते. याचे कारण म्हणजे आपल्या देशात विभूतीपूजेचा इतका कडेलोट झालेला आहे की, गुरुस्थानी मानल्या गेलेल्या बुवाने, महाराज, स्वामीने जर ‘बैल दूध देतो” असे म्हटले तरी भक्त मान डोलावतात. कारण गुरूचा शब्द खाली सांडायचा नसतो वा अव्हेरायचा नसतो ही बालपणापासून दिलेली शिकवण! ही शिकवण विद्यार्जन करीत असताना विद्यार्थीदशेत अमलात आणली तर समजण्यासारखे आहे, पण शिकूनसवरून आपण जेव्हा समाजात वावरू लागतो, तेव्हा आपण आपले गुरू पारखून घ्यायला नकोत का?
‘संत’, ‘साधू’ ही उपाधी आपण किती स्वस्त करून टाकली आहे याचा विचार करायचा की नाही? निसर्गाचे म्हणजे विज्ञानाचे नियम मोडून कोणी चमत्कार करू शकत नाही हे आपल्याला विज्ञान युगात ज्ञात होऊनही जेव्हा मंडळी चमत्कार करणाऱ्या बाबाला, मातेला शरण जाऊन गुरुपदी बसवतात तेव्हा आश्चर्य वाटते. कारण चमत्कार दाखवून भक्त गोळा करणारा बाबा हा एक नंबरचा लबाड अन् बदमाश असतो हे समजायला मोठय़ा बुद्धिमत्तेची गरज लागत नाही. सोपे गणित सोडवण्यापेक्षा कठीण गणित सोडविण्यात जी मजा असते ना, तीच मजा आपले प्रश्न आपणच सोडविण्यात असते. क्वचित प्रसंगी मार्गदर्शनाची गरज पडते, नाही असे नाही, पण त्याचे उत्तर आपल्याला एखाद्या ग्रंथातही मिळू शकेल, नव्हे मिळते. म्हणून तर ’ग्रंथ आपले गुरू’ असे म्हटले जाते. ग्रंथाप्रमाणे आपल्या क्षेत्रातील ज्ञानी व्यक्तीही आपल्याला मार्गदर्शन करू शकते. या आधुनिक काळात तर तुम्हा आम्हा सर्वांना एक महागुरू उपलब्ध झाले आहेत ते म्हणजे ‘गुगल’! गुगल म्हणजे क्षणार्धात उपलब्ध होणारा ज्ञानाचा महाखजिनाच आहे. तेव्हा फसव्या अन् वांझोटय़ा व्यक्तिपूजेला आपण जेवढय़ा लवकर तिलांजली देऊ तेवढे आपले, आपल्या समाजाचे अन् पर्यायाने आपल्या देशाचे भले होईल. आपले प्रश्न आपण सोडविण्याऐवजी आपण ते कुठल्यातरी परक्या माणसाच्या गळ्यात मारण्याची जी प्रवृत्ती आहे त्याबद्दल कविवर्य मंगेश पाडगावकर यथार्थपणे म्हणतात,
’इथे हवा प्रत्येकासी एक जबरी बुवा
जो काढील आमच्या चिंतेच्या उवा
आपण शोधायचे नाही, लढायचे नाही
भिडायचे नाही आयुष्याला!
चला तर मग, लढूया संकटाशी,
भिडू या आयुष्याला,
सोडवू या आपणच आपल्या आयुष्याचे गणित.
मग ते सोपे असो अथवा कठीण !’
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत)

























































