Chandrayaan 2 – इस्त्रोने दिली ‘ऑर्बिटर’ व ‘विक्रम’बाबत महत्त्वाची माहिती

3614

इस्त्रोचे (ISRO) प्रमुख के. सिवन यांनी ‘चांद्रयान-2’ बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. चांद्रयान-2 चे ऑर्बिटर उत्तमरित्या काम करत आहे. ऑर्बिटरची सर्व उपकरणे चांगले काम करत असून फोटो आणि माहिती पाठवत आहे, असे सिवन यांनी सांगितले. विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हरचा संपर्क का तुटला याबाबत एक राष्ट्रीय स्तरावरील समिती विश्लेषण करत असल्याचेही सिवन म्हणाले.

हिंदुस्थानच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असणाऱ्या चांद्रयान-2 मोहिमेला 7 सप्टेंबरला धक्का बसला होता. दक्षिण धृवावर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. यानंतर त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. परंतु चंद्राची परिक्रमा करणारे ‘ऑर्बिटर’ अपेक्षेप्रमाणे काम करत आहे. त्याचे सर्व प्रकारचे ऑपरेशन सुरू असून कार्य उत्तम सुरू आहे. परंतु विक्रम लँडरकडून आम्हाला कोणताही सिग्नन मिळालेला नाही, मात्र ऑर्बिटर चांगले काम करत आहे.

विक्रम लँडरचा संपर्क का तुटला, काय चूक झाली याचे विश्लेषण राष्ट्रीय स्तरावरील एक पथक करत आहे, असेही त्यांनी सांगितले. समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही भविष्यातील योजनांवर काम करू. या कार्यासाठी आवश्यक परवानग्या आणि अन्य प्रक्रियांची आवश्यकता असते. आम्ही यावर काम करत आहोत, असे सिवन म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या