
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
इस्रोची महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहीमेचे प्रक्षेपण काही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले आहे. प्रक्षेपणाच्या सुमारे 56 मिनिटे आधी मोहिमेचे काऊंटडाऊन थांबवण्यात आले. सोमवारी मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 अंतराळात झेपावणार होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही मोहीम रद्द करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-2 या बाहुबली रॉकेटच्या सहाय्याने हे यान अवकाशात झेपावणार होते. आता हे यान अंतराळात कधी झेपावणार याबाबत उत्सुकता आहे. येत्या चार दिवसात चांद्रयान-2 चे प्रक्षेपण झाले नाही तर मोहीम तीन महिने पुढे ढकलावी लागणार आहे.
क्रायोजेनिक इंजिन आणि चांद्रयान-2 ला जोडणाऱ्या लाँच व्हेईकलमध्ये योग्य दबाव निर्माण होत नसल्याने मोहीम रद्द करण्यात आली. हा तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याचा शोध घेण्यात येत आहे. येत्या चार दिवसात चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करण्यासाठी इस्रोकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. चांद्रयान-2 मध्ये किंवा रॉकेटमध्ये कोणताही बिघाड झालेला नाही. जीएसएलव्ही-3 च्या क्रायोजेनिक इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याचे इस्रोतील सूत्रांनी सांगितले. आता रॉकेटमधील सर्व भागातील इंधन रिकामे करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया खूप जटील आणि वेळखाऊ आहे. मात्र, इस्रोच्या वैज्ञानिकांनी याआधाही हे काम केल्याने त्यात अडचणी नसल्याचे सांगण्यात आले. क्रायोजेनिक इंजिनातून इंधन काढण्याची प्रक्रिया आव्हानात्मक असते. ते इंधन द्रव हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या स्वरुपात असल्याने त्याचे उणे 156 तापमान कायम ठेवावे लागते. हे ज्वलनशील इंधन असल्याने ते तातडीने रिकामे करण्यात येणार आहे.
इंधन रिकाने करण्याचे काम झाल्यानंतर रॉकेट आणि चांद्रयानचे भाग वेगवेगळे करण्यात येतील.त्यामुळे पूर्ण यंत्रणेची तपासणी शक्य होणार आहे. त्यानंतर तपासणी समिती तांत्रिक बिघाड शोधणार असून त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तांत्रिक बिघाड शोधण्यासाठी इस्रो विविध केंद्रातील वैज्ञानिकांची समिती बनवणार आहे. ही समिती यान, रॉकेट आणि लाँच व्हेईकलची तपासणी करेल. तसेच लाँच शेड्यूल तपासण्यात येणार आहे. त्यानुसार पुन्हा सर्व चाचण्या घेऊन प्रक्षेपणाची पुढील तारीख ठरवण्यात येणार आहे. ती तारीख निश्चित झाल्यावर पुन्हा रॉकेट आणि चांद्रयान-2 ला जोडण्यात येणार आहे. त्यानंतर संगणकावर पुन्हा शेड्युलिंग करण्यात येईल. त्यामुळे संगणकात सर्व तांत्रिक बाबी दिसतील. त्यानंतर 20 किंवा 24 तासांचे काऊंटडाऊन सुरू होईल. या काऊंटडाऊन दरम्यान संगणावर सर्व योग्य असल्याचे संकेत मिळाल्यावर चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी बराचवेळ लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, चार दिवसात हे यान लाँच करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चार दिवसात याचे प्रक्षेपण झाले नाही तर पुढील प्रक्षेपण तीन महिने लांबणीवर पडणार असून ऑक्टोबरमध्ये पुढील तारीख असेल. पृथ्वी आणि चंद्रातील अंतर कमी असेल त्याचवेळी यानाचे प्रक्षेपण करणे फायद्याचे ठरते. तसेच पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांची आणि यानाची टक्कर होण्याची शक्यताही कमी असते. प्रक्षेपणाच्या पुढील तारखेबाबत त्रिवेंद्रममधील स्पेस फिजिक्स लॅब निर्णय घेणार आहे. येत्या चार दिवसात प्रक्षेपण झाले नाही तर 10 ते 26 ऑक्टोबरदरम्यान पुढील प्रक्षेपण होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
























































