
सामना प्रतिनिधी। चंद्रपूर
नागरी सुविधांकरीता चिमूर नगर पालिकेला मिळालेल्या दोन कोटी रुपयांचे काम सा. बां. वि. मार्फत शहराच्या केवळ काही ठराविक प्रभाग करण्याच्या आमदार बंटी भांगडिया यांचा अट्टहास जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी हाणून पाडला, असा दावा चिमुरचे नगराध्यक्ष गोपाल झाडे यांनी केला.
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आज ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. नगर परिषदेची निर्मिती झाल्यानंतर पहिली अडीच वर्ष भाजपची सत्ता होती. तेव्हा आमदार भांगडिया यांनी आपल्या वाढदिवसाला प्रभाग क्रमांक १ आणि १० मध्ये दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर करणार अशी घोषणा केली. पण प्रत्यक्षात तेव्हा निधी मिळालाच नाही. त्यानंतर पालिकेत सत्तांतर झाले. दोन कोटींच्या विकास निधीसाठी पालिकेने पाठपुरावा केला. निधी मिळाला. पण आमदारांना स्वतः:च्या मर्जीप्रमाणे निधी खर्च करायचा आहे. त्यासाठी विकास आराखड्याला सुद्धा धाब्यावर बसविण्याचा प्रयत्न आमदारांनी केला, असा आरोप झाडे यांनी केला. दोन कोटी रुपये केवळ प्रभाग क्रमांक १ आणि १० मध्येच खर्च करण्याचा घाट घातला गेला. निधीचा विनियोग करणारी यंत्रणा नगर परिषद आहे.
मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे केली जावी, असा अट्टहास आमदारांचा होता, असे सत्ताधारी काँग्रेस पदाधिका-यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी यांनी २० नोव्हेंबर २०१८ ला पालिकेला एक पत्र पाठविले. त्यात शहर विकास आराखड्यानुसार कामे प्रस्तावित आहे. शासन निर्णयाच्या अटी व शर्ती होत आहे, असे हमीपत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नागरी सुविधा निधीचा विनियोग करण्या करिता कामे ठरविणे आणि मंजुरी देणे हा पालिकेचा अधिकार असल्याचे स्पष्ट झाल्या दावा सत्ताधा-यांकडून करण्यात आला आहे, असे झाडे यांनी म्हटले आहे. विकास या एकाच मुद्द्याचा आ. भांगडीया उच्चार करत असतात मात्र हा विकास त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांचा होत असून त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या घटकात देखील हस्तक्षेपाला आमदार भांगडीया धजावत नसल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. पत्रपरिषदेला नगरसेवक तुषार शिंदे, विनोद ढाकुनकर, शिवसेना नगरसेवक उमेश हिंगे आदींची उपस्थिती होती. भाजप आमदाराने थेट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामात हस्तक्षेप करण्याच्या या घटनेने जिल्ह्यातील राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.






























































