
सामना प्रतिनिधी। चंद्रपूर
महावितरणचा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी, व्यावसायिक व शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे संतप्त झालेल्या पोंभूर्ण्यातील युवा सैनिकांनी विज वितरण कंपनीच्या उपविभागिय अभियंत्यांना सोमवारी घेराव घातला. विज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आला. युवासेनेचे जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे व उप जिल्हा प्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वाखाली हा घेराव घालण्यात आला होता.
महावितरणने कृषी पंपधारक शेतकऱ्यांना अखंडीत विज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र हे आश्वासन हवेतच विरले असून महावितरण शेतकऱ्यांची ,पिळवणूक करत आहे. २४ तास विद्युत पुरवठा केवळ कागदोपत्रीच आहे.याबदद्ल महावितरणाला वारंवार तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासू विजेचा हा खोळंबा सुरू आहे. मात्र आकारणी पेक्षा अवाजवी बिल ग्राहकांना येत असून याचा भूर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे वरील सर्व समस्या घेऊन युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाला घेराव घातला. समस्या निराकरणासाठी मागण्याचे निवेदन दिले व दुर्लक्ष केल्यास कार्यालयालाच टाळे ठोकू असा सज्जड दम भरला.






























































