इस्रोने दिली खुशखबर, विक्रम लँडर सुस्थितीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vikram-lander

चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना संपर्काबाहेर गेलेल्या विक्रम लँडरबाबत इस्रोने खुशखबर दिली आहे. विक्रम चंद्रावर सुस्थितीत असून कुठेही त्याची मोडतोड झालेली नाही, असे इस्रोने म्हटले आहे.

 इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रोच्या एका अधिकाऱ्याने इस्रोचे संशोधक सातत्याने विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती दिली आहे. विक्रमशी संपर्क होईल असा त्यांना विश्वास असून या विश्वासावरच आमच्या आशा टिकून आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. ऑर्बिटरने विक्रम लँडरचे फोटो पाठवले आहेत. त्यावरून विक्रम सुस्थितीत असून तो एका बाजूला झुकलेला आहे, अशी माहिती त्याच्या फोटो आणि इतर डेटावरून समोर आली आहे.

विक्रम पुन्हा चालू शकतो

विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावरील अपेक्षित ठिकाणापासून 500 मीटर लांब जमीनीवर पडला आहे. पण त्याच्याशी संपर्क झाल्यास तो पुन्हा उभा राहू शकतो. पडल्यानंतर पुन्हा उभे राहण्याची तंत्रज्ञान प्रणाली त्याच्यात बसवण्यात आली आहे. पण त्यासाठी त्याच्याबरोबर संपर्क होणे गरजेचे आहे. संपर्क झाल्यानंतरच तो इस्रोच्या निय़ंत्रण कक्षाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करू शकणार आहे. त्यामुळे येत्या 11 दिवसात विक्रमशी संपर्क साधण्याचे आव्हान इस्रोपुढे आहे.