अहिल्यानगर महानगरपालिका मतदान केंद्रावर सकाळीच गोंधळ; मतदार संतप्त

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदान सुरू होताच अनेक मतदान केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. प्रशासनामार्फत नागरिकांना मतदान केंद्राच्या स्लीप न मिळाल्याने अनेक मतदारांना आपले नाव शोधण्यात अडचणी आल्या. परिणामी काही नागरिकांना मतदान न करता माघारी परतावे लागल्याचे चित्र दिसून आले.

मतदान केंद्र परिसरात मोबाईल वापरास बंदी असल्याने तसेच सकाळच्या सत्रात मतदारांची नावे शोधून सांगण्यासाठी एकही प्रशासनाचा कर्मचारी उपलब्ध नसल्याने संभ्रम अधिक वाढला. यावेळी काही अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप नागरिकांनी केला. यामुळे संतप्त मतदार आणि अधिकारी यांच्यात वादावादीचे प्रकारही घडल्याची माहिती आहे.

दरम्यान, चार वेगवेगळ्या रंगांच्या चार मतपत्रिका असताना स्वतंत्र मशीन लावणे अपेक्षित असताना एकाच मशीनवर दोन मतपत्रिका लावण्यात आल्याने अनेक मतदार गोंधळून गेले. मतदान प्रक्रिया समजून घेण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. याशिवाय, काही मतदान केंद्रांवर अधिकाऱ्यांनी “तुम्हाला बाहेरून जाऊन क्रमांक आणावा लागेल, आम्ही तुमचे नाव शोधणार नाही,” अशा स्वरूपाची उत्तरे दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.