प्राणहितेच्या सीमेवर…

76

अनंत सोनवणे

चपराळा गावाच्या नावावरून या अभयारण्याला चपराळा हे नाव मिळाले… या गावाजवळच्या वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम होतो आणि तिथून ती प्राणहिता नावाने ओळखली जाते. प्राणहिता नदीने चपराळा अभयारण्याची पश्चिम सीमा आखून दिली आहे.

महाराष्ट्रातला जंगलांनी सर्वाधिक व्यापलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली. या गडचिरोली जिह्यातले एक अत्यंत सुंदर, परिपूर्ण जंगल म्हणजे चपराळा. इथल्या संपन्न जैवविविधतेमुळे 1986 मध्ये या जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळाला. चपराळा अभयारण्य गडचिरोली जिह्याच्या मूलचेरा आणि चार्मोशी या तालुक्यांमध्ये पसरलेले आहे. चपराळा गावाच्या नावावरून या अभयारण्याला ‘चपराळा’ हे नाव मिळाले. या गावाजवळच वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम होतो आणि तिथून पुढे ती ‘प्राणहिता’ नावाने ओळखली जाते. प्राणहिता नदीने चपराळा अभयारण्याची पश्चिम सीमा आखून दिली आहे तर पूर्व, उत्तर व दक्षिण सीमा अलापल्ली वन विभागाच्या पेडी गुंडाम रेंजला जोडून आहे. पश्चिमेला प्राणहिता नदीच्या पलीकडच्या काठावर सुरू होते तेलंगणा राज्य. नदीचे दोन्ही काठ गर्द वृक्षराजींनी व्यापलेले आहेत.

चपराळा अभयारण्यातल्या वैविध्यपूर्ण अधिवासामुळे इथल्या वन्यजीवनातही खूप वैविध्य आहे. नव्वदच्या दशकात या जंगलात वाघांची संख्या लक्षणीय होती, मात्र त्यांच्या संवर्धनाकडे पुरेसे लक्ष पुरवले गेले नाही. त्यामुळे वाघांची संख्या वेगाने कमी होत गेली आणि आज तर या आदर्श अधिवासातून वाघ जवळपास नामशेष झाला आहे. हे अभयारण्य ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व छत्तीसगड राज्यातला इंद्रावती व्याघ्र प्रकल्प या दोहोंना जोडणारा दुवा आहे. त्यामुळे क्वचित कधी तरी इथे वाघाचे दर्शन होते. या जंगलात फार पूर्वी वाघांबरोबरच बिबटय़ांचीही मोठय़ा प्रमाणावर शिकार होत असे. सुदैवाने बिबटय़ा इथे आपले अस्तित्व अजूनही टिकवून आहे. वाघ आणि बिबटय़ाचे भक्ष्य असलेले चितळ, सांबर, काळवीट, चौशिंगा, नीलगाय हे तृणभक्षी प्राणी इथे मोठय़ा प्रमाणावर आहेत. याशिवाय इथे रानडुक्कर, अस्वल, रानमांजर, लांडगा, कोल्हा, वावर, ताडमांजर, झाडचिचू, वटवाघूळ इत्यादी प्राणीही इथे पाहायला मिळतात. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेला शेकरू या जंगलात आढळतो. इथे आढळणाऱया सरपटणाऱया प्राण्यांमध्ये अजगर, नाग, फुरसे, घोणस, आग्या मण्यार, धामण, बिरोळा, डुरक्या घोणस, नानेटी, घोरपड यांचा समावेश होतो.

haran-2

पावसाळय़ात वर्धा आणि वैनगंगा नद्या दुथडी भरून वाहू लागतात. अभयारण्यातले ओढेही भरभरून वाहतात. या पाण्याने विविध प्रकारचे मासे, कोळंबी आणि कासवांची एक परिपूर्ण जैवसंस्था विकसित केली आहे.

अभयारण्यातल्या तलावांनी इथले पक्षी जीवनही समृद्ध केले आहे. हिवाळय़ात मुर्गीकोंटा, रायकोंटा, कोमटकोंटा, लगाम, अनखोडा तलाव, चंदनखेडी नाला आणि वैनगंगा नदीच्या परिसरात उत्तम पक्षी निरीक्षण करता येते. इथे पक्ष्यांच्या 190 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. त्यात पांढऱया पाठीचे गिधाड, घुबड, सर्पगरुड, शिल, वहिरी ससाणा, श्येन, सोनपाठी सुतार, रानकस्तूर, दयाळ, चिरक, मल्कोहा, लालसरी, चक्रवाक, चतुरंग बदक, रंगीत करकोचा, उघडय़ा चोचीचा करकोचा यांचा समावेश होतो. चपराळय़ात महाशिवरात्रीला मोठय़ा संख्येने भाविक येतात. या अभयारण्याला त्याचे हरवलेले व्याघ्रवैभव पुन्हा प्राप्त व्हावे अशी प्रार्थना आपण भगवान श्री शंकराकडे करूया.

चपराळा वन्यजीव अभयारण्य

 प्रमुख आकर्षण

जिल्हा…गडचिरोली

राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…134.78 चौ. कि. मी.

निर्मिती…25 फेब्रुवारी 1986

जवळचे रेल्वे स्थानक…बल्लारपूर (70 कि. मी.), चंद्रपूर (85 कि. मी.)

जवळचा विमानतळ…नागपूर (245 कि. मी.)

निवास व्यवस्था…चपराळा, आलापल्ली, मरकडा इथे वन विभागाची विश्रामगृहे

सर्वाधिक योग्य हंगाम…डिसेंबर ते मे

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही

 

आपली प्रतिक्रिया द्या