तीर्थ महात्म्य

>> निळकंठ कुलकर्णी

सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ असे गंगातीर्थ आहे या गंगेचे तीन स्थाने सोडून सर्वत्र दर्शन होते ती तीन स्थाने म्हणजे हरिद्वार, प्रयाग व गंगासागर संगम होय.

प्रयाग हे महत्वाचे तीर्थ आहे आणि मृतात्म्यांना मुक्ती देणारे आहे. कुरुक्षेत्रदेखील परमोत्तम तीर्थ आहे. या तीर्थावर दान-धर्म करणारा माणूस मुक्ती आणि भुक्ती दोन्हींही मिळवितो. द्वारकापुरी अत्यंत रमणीय तीर्थ आहे. तर केदारतीर्थ सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारे आहे. याशिवाय कांचापुरी, तुंगभद्रा, श्रीशैल, रामेश्वर इत्यादी अनेक श्रेष्ठ तीर्थ आहेत. या सर्व तीर्थांमध्ये केलेले स्नान, दान, तप, पूजा, श्राद्ध पिंडीदान आदी कर्मे अक्षय होतात. गोदावरी नदी महान तिर्थस्वरूप अशी आहे. तर पयोष्णी उत्तम वर देणारी आहे. ही सर्व तीर्थ सर्व प्रकारच्या पापांना शुद्ध करणारी व मोक्ष देणारी आहेत.

ब्रह्मध्यान – म्हणजेच एकांत अशा जागेत एकाग्र चित्ताने ब्रह्माचे चिंतन करणे, हेही एक श्रेष्ठ तीर्थ मानले गेले आहे. आपल्या संपूर्ण इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण ठेवणेदेखील एक प्रकारचे तीर्थच आहे. इंद्रियांना काबूत ठेवणे श्रेष्ठ तीर्थ आहे, तसेच आपल्या भावनांचे उदात्तीकरण करणे देखील महान तीर्थ आहे.

जो मनुष्य सर्वांनाच ब्रह्ममय मानतो, त्याची दृष्टी आणि बुद्धी यात अतीर्थ अर्थात विकारी काहीच नाही. सर्व नद्या, सर्व पर्वत देवांच्या कृपेने पवित्र आणि तिर्थस्वरूप झालेली आहेत. गंगाद्वार, कुशावर्त, विध्यक इत्यादी ठिकाणी स्नान करणाऱ्या मनुष्यास या दुनियेत पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. अर्थात तो जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो त्यास संपूर्ण मोक्ष मिळतो.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या