
चारधाम यात्रा करू पाहणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाऊस कमी झाल्याने आणि हवामान कोरडे झाल्यानंतर नागरी विमान महासंचालनालय (डीजीसीए) ने हेलिकॉप्टर सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यासंबंधी नागरी विमान उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक पार पडली असून चारधाम यात्रा अधिक सुरक्षित करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माहितीनुसार, सुरक्षेत कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. यासंबंधी डीजीसीएला कडक पावले उचलणे आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी जे आवश्यक आहे ते उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय विमान प्राधिकरण, राज्य सरकार आणि उत्तराखंड नागरिक उड्डाण विकास प्राधिकरण यांच्यातील ताळमेळ बसवण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासोबत देहरादून व दिल्लीत अनेक बैठका पार पडल्या आहेत. डीजीसीएने 13 ते 16 सप्टेंबरपर्यंत आपल्या टीमकडून सर्व हेलिपॅड, हेलिकॉप्टर संचालकांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर डीजीसीएने हेलिकॉप्टर सेवेला मंजुरी दिली. याशिवाय डीजीसीएकडून सर्व हेलिकॉप्टर संचालक कंपन्या आणि पायलटसमोरील आव्हाने व तीर्थयात्रासंबंधी आवश्यक माहिती दिली. अधिक उंचीच्या क्षेत्रातील तीर्थस्थळांपर्यंत भाविकांना ये-जा करण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा खूपच महत्त्वपूर्ण आहे. सुरक्षित आणि न थांबता ही सेवा पूर्ण व्हायला हवी. त्यासाठी हेलिकॉप्टर सेवेवर कडक देखरेख ठेवावी लागणार आहे. चारधाम यात्रेवेळी मे आणि जूनमध्ये अनेक हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते.
कुठून कुठेपर्यंत हेलिकॉप्टर सेवा
l देहरादूनच्या सहस्त्रधारा ते यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथपर्यंत चार्टर सेवा दिली जाईल.
l गुप्तकाशी, फाटा, सीतापूर क्लस्टर ते श्री केदारनाथ जी हेलिपॅडपर्यंत शटल सेवा दिली जाईल.
l सहा हेलिकॉप्टर गुप्तकाशी, फाटा, सीतापूर क्लस्टर ते हेलिकॉप्टर शटलपर्यंत सेवा देतील.