टीआरपी प्रकरणात 1400 पानांचे दोषारोप पत्र दाखल; आणखी अटकेची कारवाई होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीआरपी घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱया मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणातील 12 आरोपींविरोधात 1400 पानांचे प्रथम दोषारोपपत्र 37 व्या न्यायालयात दाखल केले. या दोषारोपपत्रामध्ये सुमारे 140 साक्षीदार समाविष्ट आहेत. यापुढेही तपासामध्ये पुराव्यांच्या आधारे अटक होणाऱया तसेच पाहिजे आरोपींविरुद्ध पुरवणी दोषारोप पत्र दाखल करण्यात येणार आहे.

बनावट टीआरपीप्रकरणी 6 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाने या गुह्याचा तपास करून सबळ पुरावे जमा केले आणि त्याआधारे अटकेची कारवाई केली. त्यानंतर 12 जणांविरोधात दोषारोपपत्र आज कोर्टात दाखल केले. या प्रकरणात आणखी अटकेची कारवाई होण्याची दाट शक्यता असून पोलीस पथक अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणातील 140 साक्षीदारांमध्ये टेक्निकल तज्ञ, फॉरेन्सिक तज्ञ, जाहिरातदार आदींचा समावेश आहे.

वॉव कंपनीचे मालकाची उद्या चौकशी
वॉव कंपनीचे मालक जयंतीलाल गडा आणि त्यांचा मुलगा अक्षय गडा यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र ते उद्या तपास पथकासमोर हजर राहणार आहेत. दरम्यान, त्यांच्याऐवजी कंपनीचे सीईओ आज आले होते. त्यांच्या प्राथमिक जबाब नोंदवण्यात आला.

रामजी आणि घनश्यामच्या जामिनावर आज सुनावणी
टीआरपी प्रकरणात अटक झालेले आणि न्यायालयीन कोठडी मिळालेले रामजी आणि घनश्याम यांच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे. वरिष्ठांच्या सांगण्यानुसार आपण सर्व केल्याचे घनश्यामने कबूल केले आहे. दरम्यान, पाहिजे आरोपी महामूव्हीजचा अमित दवे यानेदेखील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर सत्र न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे.

 रिपब्लिकच्या प्रिया मुखर्जीच्या अर्जावर सुनावणी
‘रिपब्लिक’ चॅनेलची सीईओ प्रिया मुखर्जी हिने कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यास मुंबई गुन्हे शाखेचे विशेष पथक प्रियाला ताब्यात घेतील. दोन वेळा प्रिया विशेष पथकासमोर चौकशीसाठी उपस्थित राहिली होती. अर्णब गोस्वामी सोबतचे चॅटिंग डिलिट करून ती हजर झाली होती, पण आपण गोत्यात सापडतोय असे लक्षात येताच तिने बंगळुरूला पळ काढला. तेथेही विशेष पथक तिचा शोध घेत होते, मात्र तिने कोर्टात धाव घेतली. न्यायालय अटकपूर्व जामीन मंजूर करते की फेटाळून लावणार यावर प्रियावरील कारवाई अवलंबून आहे.