कॉ. पानसरे हत्याप्रकरण; संशयितांवर दोषनिश्चिती

भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या आणि खुनाच्या कट प्रकरणातील 10 संशयितांवर आज दोषनिश्चिती करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश (तिसरे) एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणातील दहाही संशयितांना गुन्हा मान्य आहे काय? असा सवाल न्यायाधीशांनी केला असता, संशयितांनी ते अमान्य केले. आता या खटल्याची पुढील सुनावणी 23 जानेवारी रोजी होणार असून, साक्षी-पुराव्यांना सुरुवात होणार आहे. विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी बाजू मांडली.

आज सकाळी दोषनिश्चितीच्या कामकाजास सुरुवात होणार होती; पण काही संशयितांना घेऊन येणारे पोलीस दुपारी कोल्हापुरात दाखल झाले. त्यामुळे दुपारी 2.45पर्यंत कामकाज सुरू झाले. न्यायाधीशांनी संशयित प्रत्येकाला समोर बोलावून गुन्हा मान्य आहे का? अशी विचारणा केली, तेव्हा संशयितांनी ते अमान्य असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपपत्रावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या.

संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या विनंतीवरून वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी संशयितांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर तावडे, समीर गायकवाड, अमोल काळे यांनी आरोपत्रावर सह्या केल्या. ‘एसआयटी’ने तपास करून 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यांतील दोघे फरार आहेत. 10 जणांवर दोषनिश्चिती केली आहे. कॉ. पानसरे कुटुंबीयांच्या वतीने हा तपास ‘एटीएस’कडे देण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती. त्यानुसार तपास पुणे व कोल्हापूर एटीएसकडे दिला आहे.