
एमडी ड्रग्ज प्रकरणात साजीद इलेक्ट्रिकवाला याचे खंडणीसाठी अपहरण करून त्याचा महिनाभर छळ केल्यामुळे पोलिसांनी अटक केलेल्या 14 आरोपींसह अन्य 5 पाहिजे आरोपींविरोधात मुंबई गुन्हे शाखेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
ओशिवरा येथील हॉटेल अलिबाबा येथून 12 जूनच्या दुपारी दोघांचे काही आरोपींनी अपहरण केले होते. त्यात मूळचा सुरतचा असलेला आणि ड्रग्ज प्रकरणात अटकेची कारवाई झालेला साजीद इलेक्ट्रिकवाला व त्याचा साथीदार शब्बीर यांचा समावेश होता. त्या दोघांनाही रायगड येथील एका फार्म हाऊसमध्ये कोंडून खंडणीकरिता त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली होती. आरोपींनी दोघांना मारहाण करून त्यांच्या कुटुंबीयांकडे खंडणीची मागणी करू लागले. परिणामी 10 जुलै रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला. गुह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार युनिट-5चे प्रभारी निरीक्षक घनशाम नायर व त्यांचे पथक आरोपींचा शोध घेऊ लागले, तर युनिट-3चे प्रभारी निरीक्षक सदानंद येरेकर व त्यांच्या पथकानेदेखील तपास केला. अखेर पोलिसांनी या प्रकरणात 14 जणांना बेडय़ा ठोकल्या, तर अजून पाच आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्व आरोपींविरोधात युनिट-3ने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.