
सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणाऱया चतुरंग प्रतिष्ठानचे 29 वे रंगसंमेलन नुकतेच नाशिक येथे पार पडले. या वर्षी हा पुरस्कार मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई यांना त्यांच्या कार्यासाठी देण्यात आला.
नाशिकच्या कालिदास नाटय़गृहात चतुरंग प्रतिष्ठान आयोजित जीवन गौरव पुरस्कार प्रदान आणि गौरव सोहळ्यानिमित्त आयोजलेल्या रंगसंमेलनात सन्मानमूर्ती, 83 वर्षांचे सय्यदभाई त्यांच्या आसनासमोर ठेवत असलेला माईक नाकारून, काठी टेकत, ताठ मानाने पोडियमवर पोहचले आणि आपले विचार मांडण्यासाठी बोलू लागले, तेव्हा गच्च भरलेल्या कालिदास नाटय़गृहातील प्रेक्षक, त्या वयोपरत्वे थकलेल्या देहातील धगधगते अग्निकुंड, जिव्हेतील लालित्य पाहून थरारून गेले, अचंबित झाले. 83 वर्षीय हा तरुण व्यासपीठावरून खुलेपणाने म्हणत होता, आता तीन तलाकनंतर माझं उद्दिष्ट आहे, ‘समान नागरिक कायदा…’ आणि मग प्रत्येक प्रेक्षकाच्या मनांत हेच शब्द घुमत राहिले… अभी तो मैं जवान हूँ, अभी और उडान बाकी हैं, जमीन नहीं मंजिल मेरी, अभी पुरा आसमान बाकी है…
सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात खास कामगिरी करणाऱया व्यक्तीला चतुरंग रंगसंमेलनात जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तीन लाख रुपये, सन्मान चिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. त्यानिमित्ताने विविध रंगांनी नटलेला, नवरसाने युक्त असा हा चतुरंग रंगसंमेलनाचा नावीन्यपूर्ण सोहळा असतो. चतुरंग रंगसंमेलनाचे हे 29 वे वर्ष! या वर्षी हा पुरस्कार मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई (पुणे) यांना ‘तीन तलाक’ प्रथेविरुद्ध त्यांनी दिलेल्या प्रदीर्घ लढय़ाच्या कार्यासाठी देण्यात आला.
नाशिकमध्ये आयोजित केलेले संमेलन म्हणून कुसुमाग्रजांवरील एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने संमेलनाची नांदी झाली. ‘हा सूर्य हाच चंद्र’ या नावाच्या या नाटय़ाची निर्मिती दिनू पेडणेकर यांची होती. धनश्री लेले यांचं अभ्यासपूर्ण लेखन असलेल्या या नाटकाचं देखणं सादरीकरण चिन्मय मांडलेकर आणि दीपक करंजीकर यांसारख्या चतुरस्त्र्ा अभिनेत्यांनी रंगमंचावर जिवंत केले. नाशिककरांना त्यांच्या आवडत्या तात्यासाहेबांची ही पुनर्भेट खूपच आनंद देऊन गेली.
चतुरंग रंगसंमेलनाचे उद्घाटन दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे सुरेखरीत्या केले जाते. या वर्षी 29 वे संमेलन म्हणून नाशिकशी जोडल्या गेलेल्या 29 मान्यवरांनी, नाशिक ढोलाच्या गजरात प्रेक्षागृहांच्या मागच्या बाजूने प्रेक्षकांमधून व्यासपीठावर येऊन नटेश्वराला फुलांची ओंजळ वाहून उद्घाटन केले. सुप्रसिद्ध लेखक आणि कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी या वर्षीच्या स्मरणिकेच्या अंतरंगावर प्रकाश टाकला.
आणि मग सुरू झाली ‘स्वरभावयात्रा’ जणू आनंदयात्राच! या आनंदयात्रेचे वारकरी होते, एकाहून एक सरस असे गायक, रवींद्र साठे, अनुराधा मराठे, नीलाक्षी पेंढारकर, मृदुला दाढे-जोशी, मानसी जोशी आणि स्वरभावयात्रेचे संकल्पक आणि चतुरंग कार्यकर्त्याचीही जबाबदारी सक्षमपणे पेलणारे विनायकराव जोशीही, शिवाय त्यांच्या बरोबर वाद्यसाथीला होते. चतुरंग कार्यकर्ता गिरीश प्रभू, महेश खानोलकर, संगीत मयेकर आणि समयोचित निवेदन करणाऱया डॉ. समीरा गुजर. 93 वर्षांची परंपरा असलेली ही भावगीते, अगदी पार ‘राजहंस माझा निजला’पासून ते पाश्चात्य संगीत असलेलं ‘येऊ कशी प्रिया’पर्यंतची! त्यानंतर रात्री पं. रोणू मजुमदार (बांसरी), पं. भवानी शंकर (पखावज) आणि आदित्य कल्याणपूर (तबला) यांची नादवैभव ही मैफल होती. दुसऱया दिवसाचा सत्रारंभ झाला, तो मराठी-हिंदी-गुजराथी भाषा उत्तम अवगत असणाऱया, नाटय़-चित्र-मालिका यात लीलया वावरणाऱया आणि ‘चाणक्य’ म्हणून परिचित असणाऱया मनोज जोशी या कलाकाराच्या मुलाखतीने! जुने-जाणते, चतुरंग प्रेमी, सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी नेमके प्रश्न विचारून मनोजजींचा आर्य चाणक्यपर्यंतचा प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडला. या मुलाखतीनंतर चतुरंग फेम चहापान संमेलनात रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवादही साधता आला.
भल्याभल्यांना कायद्याची चपराक देणारे प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम, बीजेपीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे माजी संचालक विनय सहस्रबुद्धे, विनोदी चरित्र अभिनेते जयंत सावरकर, गेल्या वर्षीच्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर, 2017 च्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आणि प्रसिद्ध मूर्तिशास्त्र्ा व मंदिर स्थापत्यशास्त्र्ा तज्ञ डॉ गो. बं. देगलूरकर, मनोज जोशी, मत्स्यगंधा आशालता, श्वासधारी अरुण नलावडे, बोलक्या बाहुल्याकार श्री. व सौ. पाध्ये, प्रदीप वेलणकर, दुसऱयाच्या मनातले नेमके उलगडवणारे सुधीर गाडगीळ, आपल्या पदन्यासाने मोहित करणारी सोनिया परचुरे, आ. संजय पाटील, कवी नरेश महाजन, चित्रकार स्वाती राजवाडे या साऱया नामवंतांशी रसिकांना बातचीत करता आली,
त्यानंतर सुरू झाला तो सय्यदभाईंना देण्यात येणारा चतुरंगचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान आणि गौरव सोहळा! सय्यद भाई, अतिशय साधं, पण तेवढंच उत्तुंग लढवय्या व्यक्तिमत्त्व. हा पुरस्कार प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते देण्यात आला. सय्यदभाईंबद्दल उज्ज्वलजी अतिशय आत्मीयतेने बोलले. समाजातील अंशतः रूढी, परंपरा या विघातकच आहेत. पण सध्याच्या व्यवस्थेत धर्मावर बोलणे म्हणजे विस्तवाशी खेळणे आहे, अशा वेळी तलाक व्यवस्थेवर वयाच्या विसाव्या वर्षांपासून सय्यदभाईंनी केलेलं काम हे नक्कीच धाडसाचे आहे, अशा शब्दात उज्ज्वलजींनी सय्यद भाईंच्या कार्याचा गौरव केला. सय्यदभाई यांनी अगदी मोलाचे विचार मांडले, ‘स्त्र्ााrला माणूस म्हणून न्याय मिळाला पाहिजे, मोलकरीण म्हणून नव्हे. समान नागरी कायदा झाला पाहिजे. मातृभूमीबद्दल तडजोड नको. ती आपली आई आहे, तिची काळजी घ्या.’ आपल्या पत्नीबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विजय कुवळेकर यांनी सय्यदभाईंबद्दल गौरव शब्द बोलताना त्यांनी तलाक प्रथेविरुद्ध दिलेला प्रदीर्घ लढा आणि त्यांचे पुस्तक ‘दगडावरची पेरणी’ यांवर विस्तृत विवेचन केले.
चतुरंग प्रतिष्ठान तर्फे मेघना काळे यांनी केलेल्या प्रास्ताविकेमध्ये चतुरंग जीवन गौरव पुरस्कार, त्याचा इतिहास आणि आतापर्यंतचा त्याचा प्रवास नेमकेपणाने उपस्थितांसमोर मांडला. चतुरंग संस्थापक कार्यकर्ते विद्याधर निमकर यांनी या संमेलनात सहभाग असलेल्या सर्वांच्या सहकार्याची दखल घेत सर्वांप्रती ऋणनिर्देश केला. या सोहळ्याअखेरीस प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आली, ती चतुरंगच्या तरुण कार्यकर्त्यांची फौज! चतुरंग शैक्षणिक प्रकल्पाअंतर्गत चालणाऱया निवासी-निर्धार वर्गातील हे माजी विद्यार्थी, आज पुणे – मुंबई- रत्नागिरीसारख्या ठिकाणी आपली नोकरी, व्यवसाय, पुढील शिक्षण सांभाळून चतुरंग कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. कुठल्याही संस्थेला हेवा वाटावा अशी ही तरुण कार्यकर्त्यांची फौज, चतुरंगच्या गणवेशात, हाती फुलांची ओंजळ घेऊन जेव्हा प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिस्तीने व्यासपीठावर रांगेत उभी ठाकली, तेव्हा रसिकांनी टाळ्यांच्या गजरांत ही मानवंदना स्वीकारली.
आणि मग सुरू झाले, रंगसंमेलनाचे अखेरचे सत्र गीतरामायण. ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या दोन सिद्धहस्तांच्या जन्मशताब्दी वर्षांत ग. दि. माडगूळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली, बाबूजींच्या गायनाने घराघरांत पोहोचलेली ही रामकथा सोनिया परचुरे, नकुल घाणेकर आणि त्यांच्या शिष्यांनी व्यासपीठावर आपल्या उत्तम अभिनयाने, चपळ, तेजस्वी गतिमान हालचालीने आणि कल्पनातीत ऊर्जेने नृत्यस्वरूपात रंगमंचावर अशी काही सादर केली की प्रत्येक प्रसंगात आपणच त्या रामचरित्रात सहभागी असल्याची अनुभूती प्रेक्षकांनी घेतली.
>> विनायक काळे





























































