कच्च्या तेलामुळे हिंदुस्थानच्या कंपन्या मालामाल; पेट्रोल-डिझेल विकून कमावले, 23 हजार 743 कोटी रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक स्तरांवर कच्च्या तेलांच्या किमती या अनेक वर्षांपासून 65 ते 70 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहेत. परंतु, देशांतर्गत तेल कंपन्यांनी जागतिक स्तरांवर स्वस्तात कच्चे तेल खरेदी केल्यानंतर सुद्धा देशात मात्र भरमसाट किमतीत पेट्रोल आणि डिझेलची विक्री केली आहे. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने शंभरी गाठली आहे. या इंधन विक्रीतून तेल कंपन्यांनी अवाच्या सवा नफा कमवला आहे, हे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तीन प्रमुख सरकारी कंपन्यांना चालू आर्थिक वर्ष 2025-26 च्या डिसेंबरच्या तिमाहीत 23 हजार 743 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. जो मागील वर्षीच्या 10 हजार 545 कोटी रुपयांच्या तुलनेत दुप्पटहून अधिक आहे.

मागील वर्षभराच्या आकडेवारीनुसार, इंडियन ऑइल काॅर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड या तीन तेल कंपन्यांच्या नफ्यात सर्वात मोठी वाढ ही रिफाइनिंग मार्जिन आणि एलपीजीची रिकव्हरी बनली आहे. इंडियन ऑईल काॅर्पोरेशनची ग्रॉस रिफाइनिंग मार्जिन डिसेंबर तिमाहीत चार पट वाढली आहे. भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशनचा जीआरएम दुप्पटहून अधिक वाढला आहे. ही वाढ कच्च्या तेलात स्वस्ताई आल्यामुळे झाली आहे. देशात एक लाखांहून अधिक पेट्रोल पंप आहेत. यात 90 टक्के भागीदारी ही याच तिन्ही सरकारी कंपन्यांकडे आहे. बाकीची भागीदारी ही नायरा, रिलायन्सकडे आहे.

एलपीजीमुळे कमाईत वाढ

आयओसीने डिसेंबरच्या तिमाहीत 12,126 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. बीपीसीएल आणि एचपीसीएलने अनुक्रमे 7 हजार 545 कोटी आणि 4 हजार 72 कोटी रुपयांचा नफा मिळवला. डिसेंबरच्या तिमाहीत सरकारने जेवणासाठी वापरल्या जाणाऱया गॅसला बाजारात कमी किमतीत विकण्याचे तेल कंपन्यांना सांगितले होते. त्या बदल्यात कंपन्यांना दिलेल्या आश्वासनानुसार नुकसान भरपाई दिली. त्यामुळे कंपन्यांना एलपीजी कमी किमतीत विकूनही चांगली कमाई झाली आहे.

कंपन्यांकडून दिलासा नाही

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात हिंदुस्थानी सरकारी तेल कंपन्यांना कच्चे तेल स्वस्तात मिळाल्यानंतर सुद्धा या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात केली नाही. उलट, वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कच्चे तेल स्वस्तात मिळाल्यानंतर इंधनाच्या किमतीत कपात होणे अपेक्षित होते, तरीही कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष करत निव्वळ नफा कमवण्याकडे लक्ष दिल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.