
राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात गव्हाच्या शेतात चित्याचे दर्शन झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा चिता रस्ता भटकल्याने कुनोच्या जंगलातून थेट राजस्थानात पोहोचला होता. केपी 2 असे त्याचे नाव असून तो दुर्जनपूरा तालुक्यातील बंबुलिया गावात दिसून आला आहे.
नेहमीप्रमाणे बंबुलिया गावातील शेतकरी शेतात काम करत असताना त्यांना एक जंगली जनावर शेतात दिसून आले. त्यामुळे घाबरून सर्व शेतकऱ्यांनी तिथून पळ काढला व पोलिसांना तसेच वन विभागाला याबाबत कळवले. वन विभागाचे अधिकारी तिथे पोहोचले तेव्हा चिता एका झाडाखाली निवांत विश्रांती घेताना दिसला.
हा चिता गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या राजस्थानच्या काही भागात फिरताना आढळला आहे. मध्य प्रदेश वन विभागाने त्याच्या ट्रॅकिंग एक विशेष पथक नेमले असून ते त्याच्या लोकेशनवर नजर ठेवून आहेत. वन विभाग सध्या त्या चित्यावर लक्ष ठेवून असली तरी ग्रामस्थांना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.





























































