मोदी सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागाराचा अचानक राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजीनाम्यानंतर ते अमेरिकेला जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुक ब्लॉगद्वारे ही माहिती दिली आहे. अरविंद सुब्रमण्यन राजीनाम्यानंतर कौटुंबिक जबाबदारीसाठी अमेरिकेला जाणार आहेत, असे अरुण जेटली यांनी आपल्या फेसबुक ब्लॉगमध्ये नमूद केले आहे.

जेटली यांनी आपल्या फेसबुक ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ‘काही दिवसांपूर्वी केंद्राचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांच्याशी माझी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. कौटुंबिक जबाबदारी निभावण्यास ते अमेरिकेला परत जाऊ इच्छित असल्याने त्यांनी सांगितले. सुब्रमण्यन यांचे राजीनामा देण्याचे कारण खासगी असून ते त्यांच्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या निर्णयाचा स्वीकार करण्यावाचून मला गत्यंतर नव्हते.’

तसेच जेटली यांनी आपल्या ब्लॉगमध्ये पुढे म्हटले की, ‘अरविंद सुब्रमण्यन यांनी १६ ऑक्टोबर २०१४ मध्ये आपल्या पदाचा कारभार स्वीकारला होता. कार्यकाळ संपल्यानंतरही ते या पदावर कायम रहावे असे मला वाटत होते. परंतु कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी या पदावरून पायउतार होण्याचे ठरवले आहे.’ जेटलींनी सुब्रमण्यन यांचे कौतुक करताना म्हटले की, अर्थ मंत्रालय, पीएमओ ऑफिस आणि सरकारच्या विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे चांगले संबंध होते व नेहमीच संवाद होत होता.