ऑस्करवारीपूर्वी गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ वादात! चित्रपटाच्या निवडीला एफडब्ल्यूआयसीईचा आक्षेप

ऑस्करसाठी हिंदुस्थानकडून अधिकृत एंट्री म्हणून गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ पाठवण्यात येणार आहे. मात्र ऑस्करवारीपूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे. ‘छेल्लो शो’ एका हॉलीवूडपटापासून प्रेरित असल्याचे म्हणत या चित्रपटाच्या निवडीला ‘एफडब्ल्यूआयसीई’ अर्थात ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने विरोध केला आहे. तसेच या चित्रपटाची निवड अयोग्य असल्याचे म्हणत ‘एफडब्ल्यूआयसीई’ने पेंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांना एक पत्र लिहिले आहे.

एफडब्ल्यूआयसीईचे अध्यक्ष बी. एन. तिवारी आणि इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष, निर्माते अशोक पंडित यांनी ‘छेल्लो शो’च्या निवडीबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑस्करसाठी चित्रपट पाठवताना त्याची निर्मिती हिंदुस्थानी संस्थेची असायला हवी, मात्र ‘छेल्लो शो’ची निर्मिती ऑरेंज स्टुडिओ या परदेशी पंपनीने केली असून नंतर हा चित्रपट हिंदुस्थानी निर्मात्यांना देण्यात आल्याचा दावा एफडब्ल्यूआयसीईने केला आहे. तसेच पोस्टरपासून ते कथेपर्यंत हा चित्रपट ‘सिनेमा पॅराडिसो’ या हॉलीवूडपटापासून प्रेरित असल्याची चर्चा आहे. ऑस्करसाठी पाठवण्यात आलेल्या चित्रपटांनी आपला स्वतःचा विचार मांडण्याची पहिली अट आहे. ‘छेल्लो शो’ हॉलीवूडपटापासून प्रेरित असेल तर त्याचा प्रवास संपुष्टात येईल. याची गंभीर दखल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घ्यावी, चित्रपटाच्या निवड समितीवर सरकारचे नियंत्रण असले पाहिजे, असे आवाहनही एफडब्ल्यूआयसीईने केले आहे.

ही तर नियमांची पायमल्ली…
गेल्या वर्षीही ‘छेल्लो शो’ ऑस्करच्या नामांकनासाठी ज्युरींकडे पाठवला होता, मात्र त्यावेळी या चित्रपटाचे प्रदर्शन न झाल्यामुळे ज्युरींनी हा चित्रपट नाकारला आणि आता स्क्रिनिंग झाल्यानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा पात्र म्हणून घेण्यात आला आहे, असे हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवणाऱया ज्युरींचे अध्यक्ष टीएस नागभरणा यांनी अलीकडेच एका मुलाखतीत म्हटले होते. मात्र एखाद्या चित्रपटाला एकदा नाकारून तो पुन्हा ऑस्कर नामांकनासाठी पात्र ठरवणे ही नियमांची पायमल्ली आहे, असे अशोक पंडित यांनी म्हटले आहे.