मुंबईच ‘सुपर किंग, सूर्यकुमार तळपला’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। चेन्नई

सूर्यकुमार यादवची 54 चेंडूंत 71 धावांची धडाकेबाज खेळी आणि मुंबईकर गोलंदाजांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर माजी आयपीएल विजेत्यांनी यंदा पुन्हा अंतिम फेरीत मजल मारली. मुंबईने या क्वालिफायर लढतीत यजमान चेन्नईला 6 विकेट्स आणि 9 चेंडू राखून पराभूत करत फायनलचे तिकीट बुक केले. फिरकीला साथ मिळणाऱया खेळपट्टीवर सूर्यकुमार आणि ईशान किशन (31 चेंडूंत 28) यांनी तिसऱया विकेटसाठी 80 धावांची झुंजार भागीदारी साकारत मुंबईच्या विजयाचा पाया रचला. आता चेन्नईला अंतिम फेरीतील प्रवेशासाठी एलिमिनेटर लढतीत खेळावे लागणार आहे. चेन्नईने विजयासाठी समोर ठेवलेले 132 धावांचे आव्हान मुंबईने 18.3 षटकांत केवळ 4 विकेटस् गमावून पार केले आणि पाचव्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली.

क्वालिफायर राउंडच्या पहिल्या सामन्यात मंगळवारी चेन्नई सुपर किंग्जने मुंबईसमोर 132 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईने हे लक्ष्य 18.3 षटकांमध्ये 4 गडी गमावत पूर्ण केले. मुंबईच्या सूर्यकुमार यादवने नाबाद 71 धावा केल्या. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईचा एकही फलंदाज फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. चेन्नईकडून अंबाती रायुडूने सर्वाधिक 42 धावा केल्या, तर महेंद्रसिंग धोनीने नाबाद 37 धावा केल्या. चेन्नईचा या सामन्यात पराभव झाला असला तरी चेन्नईला आणखी एक संधी आहे. क्वालिफायर राउंडमधील दुसऱया सामन्यात जो संघ जिंकेल त्या संघाचा चेन्नईशी सामना होईल. आणि या सामन्यात जो संघ विजयी होईल तो संघ फायनलमध्ये जाईल. त्यामुळे पराभूत होऊनही चेन्नईच्या अंतिम फेरी प्रवेशाच्या आशा जिवंत आहेत.

फिरकीला साथ देणाऱया खेळपट्टीवर सूर्यकुमारची चमक

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी रात्रीच्या थंड वातावरणात फिरकीला चांगलीच साथ देत होती. त्याचाच लाभ उठवत लेगस्पिनर इम्रान ताहीर आणि डावखुरा फिरकीवीर रवींद्र जाडेजा या जोडीने मुंबईच्या फलदांजाना एकेक धावेसाठी झगडायला लावले. पण मंगळवार हा दिवसच मुंबईचा होता. रोहित शर्मा (4) आणि क्विंटन डिकॉक (8) ही सलामीची जोडी केवळ 21 धावांत तंबूत परतल्यावर सूर्यकुमार यादवने मुंबईच्या डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने ईशान किशनसोबत तिसऱया विकेटसाठी 80 धावांची भागीदारी साकारत मुंबईला विजयपथावर आणून सोडले. सूर्यकुमारने 10 चौकारांच्या सहाय्याने 54 चेंडूंत नाबाद 71 धावांची झुंझार खेळी साकारली आणि मुंबईला शानदार विजयासह आयपीएल अंतिम फेरीत नेऊन ठेवले.