
सामना प्रतिनिधी। राहाता
शिर्डीतील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ नकाशावर आल्यानंतर मुंबई ,दिल्ली व हैद्राबाद येथून शिर्डी विमानसेवेला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर आजपासून स्पाईसजेटने बंगळुरू, भोपाळ, जयपुर, अहमदाबाद आणि हैदराबादहून विमानसेवा सुरू केली असून आज पहिल्याच दिवशी या विमानसेवेला प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला. आता येत्या 10 तारखेपासुन चेन्नई ते शिर्डी ही 189 आसनी बोईंग विमानसेवा सुरू होणार आहे .
1 ऑक्टोबर 2017 रोज़ी साईबाबांच्या समाधी शताब्दीच्या प्रारंभालाच येथील साईबाबा अंतरराष्ट्रीय विमानसेवेचे लोकार्पण झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासुन मुंबई – शिर्डी ,हैदराबाद – शिर्डी येथून एअर इंडियाच्या एअर अलायन्सने सुरू केलेल्या विमानसेवेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हैदराबाद येथून दूसरे विमान सुरू करण्यात आले . दररोज शंभर टक्के विमान प्रवाशांनी या विमानसेवेला प्रतिसाद दिल्यानंतर गेल्या महिन्यात स्पाईसजेटने 189 आसनी डेली बोईंग विमानसेवा सुरू केली . दिल्लीच्या भाविकांचा दिल्ली शिर्डी या विमानसेवेला मोठा प्रतिसाद मिळाला .दिल्लीहून आणखी एक बोईंग विमान सुरू करण्याचा स्पाईसजेटने निर्णय केला आहे . मात्र त्याचे अजून शेड्यूलिंग झालेले नसले तरी आगामी काही दिवसातच दिल्ली शिर्डी ही दुसरी फ्लाईट सुरू होणार आहे .
नवीन वर्षात आज 6 जानेवारी 2019 पासून जयपुर- शिर्डी ,भोपाळ – शिर्डी,बंगळुरू – शिर्डी ,अहमदाबाद – शिर्डी ,हैद्राबाद – शिर्डी ही डेली विमानसेवा स्पाईसजेट( क्यू 400) 78 आसनी विमानसेवा सुरू झाली आहे .तर दर रविवारी शिर्डी हैद्राबाद विमान सेवा सुरू होणार आहे . हैदराबाद येथून शिर्डीसाठी दररोज दोन विमाने येत आहेत. आजपासुन आठवड्यातून मंगळवार व रविवार अशी आणखी दोन विमानाची भर पडणार असल्याने दक्षिणेकडील भाविकांना मोठा लाभ होणार आहे . शिर्डीच्या या एअरपोर्टवर सध्या दिवसाचीच विमानसेवा सध्या सुरू आहे . नाईट लँडीग सुविधा उपलब्ध झाल्यावर देशातील सर्वच प्रमुख शहरांमधून शिर्डीसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक विमान कंपन्यांनी तयारी दाखवली आहे . त्यात विदेशातील काही विमान कंपन्याचाही समावेश असल्याची माहीती सूत्रांनी दिली .


































































