चेन्नई एक्प्रेस सुस्साट! दुसर्‍या लढतीतही कोलकात्यावर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोलकाता

महेंद्रसिंग धोनीची चेन्नई एक्प्रेस यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत सुस्साट सुटली आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता नाइट रायडर्सचा दुसर्‍या साखळी लढतीतही 5 गडी राखून पराभव केला. 4 बळी टिपणारे फिरकीपटू इम्रान ताहिर या विजयाचा शिल्पकार ठरला.

कोलकात्याकडून मिळालेल्या 162 धावांचे लक्ष्य चेन्नईने 19.4 षटकांत 5 बाद 162 धावा करून पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अडखळत झाली होती. शेन वॉटसन (6), फाफ डू प्लेसिस (24) व अंबाती रायुडू (5) हे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्याने चेन्नईची 9.1 षटकांत 3 बाद 61 अशी अवस्था झाली होती.

रैना, जाडेजा बरसे

दुसर्‍या क्रमांकावर आलेल्या सुरेश रैनाने नाबाद 58 धावांची खेळी करीत सामना चेन्नईच्या हातातून निसटणार नाही याची काळजी घेतली. केदार जाधव (20) व कर्णधार महेद्रसिंग धोनी (16) बाद झाल्यानंतर सामना कोलकात्याकडे झुकला होता, मात्र आलेल्या रवींद्र जाडेजाने हॅरी गर्नीच्या 19 व्या षटकात सलग तीन चौकार ठोकून सामना पुन्हा चेन्नईच्या बाजूने झुकवला. या षटकात 16 धावा चोपल्याने चेन्नईला अखेरच्या षटकात 8 धावांची गरज होती. जाडेजाने पीयूष चावलाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून दडपण दूर केले व चेन्नईला स्पर्धेतील सातवा विजय मिळवून दिला.  रैनाने 42 चेंडूंत 7 चौकार व एका षटकारासह आपली नाबाद खेळी सजवली. जाडेजाने 17 चेंडूंत 5 चौकार ठोकून नाबाद 31 धावांची खेळी केली. कोलकात्याकडून सुनील नरीन आणि पीयूष चावला यांनी 2-2 फलंदाज बाद केले, तर हॅरी गर्नीला 1 बळी मिळाला. कोलकात्याचा आठ लढतीतील हा चौथा पराभव ठरला.

ख्रिस लीनची धडाकेबाज खेळी

त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाइट रायडर्सने 8 बाद 161 धावसंख्या उभारली. यात सलामीवीर ख्रिस लीनने सर्वाधिक 82 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने 51 चेंडूंत 7 दमदार चौकारांसह 6 षटकारांचा घणाघात केला. सुनील नरीन (2) व रॉबिन उत्थप्पा (0) हे फलंदाज अपयशी ठरले. नीतिश राणा (21), कर्णधार दिनेश कार्तिक (18), आंद्रे रस्सेल (10) व शुभमन गील (15) हे इतर दुहेरी धावा करणारे फलंदाज ठरले.

इम्रान ताहिरचा चौकार

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला फिरकीपटू इम्रान ताहिरने 27 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद चेन्नईसाठी सुपर कामगिरी केली. त्याने नीतिश राणा, रॉबिन उत्थप्पा, ख्रिस लीन व आंद्रे रस्सेल या प्रमुख फलंदाजांना बाद करून कोलकात्याच्या धावगतीला लगाम घालण्याचे काम चोखपणे बजावले. याचबरोबर शार्दुल ठाकूरने 2, तर मिचेल सॅण्टनरने 1 गडी बाद करून आपापले योगदान दिले.