
ऑलिम्पियाड या बुद्धिबळातील मानाच्या स्पर्धेत इंटरनेटमधील बिघाडामुळे फिडेकडून हिंदुस्थान-रशिया या दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. हिंदुस्थानच्या ऐतिहासिक यशात जगज्जेता विश्वनाथन आनंद, विदित गुजराथी, हरिकृष्णा पेतांला, अरविंद चिंदबरम, प्रग्यानंदा, नेहाल सरीन, कोनेरू हम्पी, भक्ती कुलकर्णी, हरिका, वैशाली, वंतिका यांच्यासह नागपूरच्या 14 वर्षीय दिव्या देशमुख या मराठमोळ्या मुलीचाही वाटा आहे. वडील जितेंद्र व आई नम्रता हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. पण दिव्या देशमुखला बुद्धिबळ या खेळामध्ये करिअर करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आईने डॉक्टरकी सोडली. वयाच्या पाचव्या वर्षांपासून बुद्धिबळ या खेळामध्ये पाऊल टाकलेल्या दिव्या देशमुख हिने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, जागतिक, कॉमनवेल्थ या महत्त्वाच्या सर्व स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करीत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. मात्र बुद्बिबळ स्पर्धांसाठी परदेशात जावे लागते. या खेळाच्या शिकवणीसाठी प्रशिक्षकाची नियुक्ती करावी लागते. या सर्व बाबींसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतोय. आई-वडील कर्ज काढून आपल्या मुलीला या खेळामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. याप्रसंगी लहान वयामध्ये मोठी झेप घेणाऱ्य़ा दिव्या देशमुखला आर्थिक मदतीचा हात हवाय. तिच्या आईवडिलांनी असे आवाहन केले आहे. दैनिक ‘सामना’ने मराठमोळ्या कन्येच्या कारकीर्दीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.
महिला वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे ध्येय
राष्ट्रीय स्पर्धा, वर्ल्ड चॅम्पियनशिप गाजवणाऱ्य़ा दिव्या देशमुखला आता महिला सीनियर गटात वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा ध्यास लागून राहिलाय. सध्या खुल्या विद्यापीठातून इयत्ता नववीचे शिक्षण घेत असलेल्या दिव्या देशमुखने बुद्धिबळासाठीच सर्वस्व पणाला लावले आहे.
महिला ग्रॅण्डमास्टर होण्याच्या तयारीत
दिव्या देशमुख लवकरच महिला ग्रॅण्डमास्टर होणार आहे. आता तिला महिला ग्रॅण्डमास्टर होण्यासाठी एक महिला ग्रॅण्डमास्टर नॉर्म हवा आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मास्टर होण्यासाठी तिला दोन आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळवायचे आहेत. कोरोनामुळे स्पर्धांचे आयोजन अद्याप करण्यात आलेले नाही. बुद्धिबळाच्या स्पर्धा सुरू झाल्यानंतर दिव्या देशमुखला महिला ग्रॅण्डमास्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
मुलीसाठी सर्व काही
बुद्धिबळात यशस्वी होण्यासाठी महिन्याला विमान एक ते दोन स्पर्धा खेळाव्याच लागतात. दिव्या लहान असल्यामुळे तिच्यासोबत मी किंवा तिचे वडील स्पर्धांना जात असतो. सरकारकडून एक किंवा दोन स्पर्धांचा खर्च करण्यात येतो. पण इतर सर्व स्पर्धांना आम्हालाच खर्च करावा लागतो. हा खर्च लाखांच्या घरात पोहचतो. कारण हिंदुस्थानसह परदेशातही बऱ्य़ाच स्पर्धा होत असतात. तसेच सध्या दिव्या श्रीनाथ लक्ष्मीनारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे कसब आत्मसात करते. याचाही खर्च वेगळा आहे. आम्ही दोघांनी मुलीसाठी सर्व काही करण्याचा निर्णय घेतला आहे, असे नम्रता देशमुख यांनी यावेळी सांगितले.
जगज्जेता आनंदकडून शिकवणी
हिंदुस्थानचाच नव्हे तर जगातील महान खेळाडू म्हणून ओळखला जाणारा विश्वनाथन आनंद यालाही दिव्या देशमुखचा खेळ आवडला. त्याने तिला भेटण्यासाठी स्वतःच्या घरी बोलावले. त्यानंतर दिव्या देखमुख आपल्या आईसोबत विश्वनाथन आनंदच्या घरी गेली. याप्रसंगी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदकडून मोलाच्या टीप्स मिळाल्या. खेळाबद्दलचा दृष्टिकोन, लक्ष्य याबाबतची शिकवणी दिव्या देशमुखला मिळाली.
दिव्याची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळातील उल्लेखनीय कामगिरी
- 21 वेळा देशाचे प्रतिनिधित्व
- 20 सुवर्ण, 6 रौप्य व चार कांस्य
- वर्ल्ड यूथ स्पर्धेत सलग सहा पदके
- तीन वेळा आशियाई चॅम्पियन
- चार वेळा कॉमनवेल्थ चॅम्पियन
- शिवछत्रपती पुरस्कार (2017-18)























































