
सिनेमा हे असं माध्यम आहे ज्याच्यासाठी भाषा ही केवळ नाममात्र असते. सिनेमामध्ये भाषेव्यतिरिक्त प्रेक्षकांशी संवाद साधण्याची किमया असते. भाषा ही सिनेमाच्या दृष्टीने एक जुजबी गरज आहे. हेच ‘छावा’ या चित्रपटाने सिद्ध केले आहे. छावा चित्रपट तेलगू भाषेत प्रदर्शित झाला आणि तेलगू भाषिकांच्या मनाचाही ‘छावा’ने ठाव घेतला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा तेलगू भाषेत प्रदर्शित झाल्यानंतर छावाने चांगलीच मुसंडी मारली आहे.
तेलगू रसिक प्रेक्षकांनी कायमच चांगल्या कलाकृतींना मनमुराद दाद दिलेली आहे. हेच ‘छावा’ या चित्रपटाच्या बाबत लागू पडलेले आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित ऐतिहासिक महाकाव्य गीता आर्ट्स निर्मित तेलुगू भाषेत ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला. तेलगू भाषेत प्रदर्शित झाल्यानंतर ‘छावा’ने पहिल्या दोन दिवसांमध्येच जोर धरला होता. तो जोर अगदी आठवडा उलटल्या नंतरही कायम आहे.
‘छावा’ची तिकीटबारीवरील जोरदार बॅटींग चालल्यामुळे, तेलगू प्रेक्षकांनी चॅम्पियन्स ट्रॉफीपेक्षा ‘छावा’लाच जास्त पसंती दिली. ट्रॉफी भारताने स्वतःकडे खेचून आणली त्यादिवशी तेलगू चित्रपटगृहांमध्ये क्रिकेटपेक्षा प्रेक्षकांनी ‘छावा’ला पसंती देत थिएटर्सही हाऊस फुल्ल केली होती. त्यामुळेच अवघ्या आठवड्याभरातच ‘छावा’ने भाषेची सर्व बंधनं झुगारत तेलगू भाषेतही छप्परफाड कमाई करत 12 कोटींचा गल्ला जमवला.
डब असलेल्या सिनेमांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. परंतु ‘छावा’ मात्र याला अपवाद ठरला. ‘छावा’चे तेलगूमध्ये डबिंग हे गीता आर्ट्स या निर्मिती संस्थेने विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान अगदी लीलया पेलले. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ तेलगू भाषेतही मोठे यश मिळवत आहे. प्रेक्षक विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना या प्रमुख कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.