
छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा असलेला ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 33 कोटींचा गल्ला जमवला असून चित्रपटाला मिळणारा तुफान प्रतिसाद पाहता विकेंडपर्यंत हा चित्रपट शंभर कोटींहून अधिक रुपयांची कमाई करेल, असा अंदाज आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची तर रश्मिका मंदाना हिने महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली आहे. अभिनेता अक्षय खन्ना मुघल बादशाह औरंगजेबच्या भूमिकेत आहे. थिएटरमध्ये ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या जात आहे. देशभरात खासकरून महाराष्ट्रातील थिएटरमध्ये हा चित्रपट सहकुटुंब पाहण्यासाठी गर्दी होत आहे. अगदी पहाटेचे शोदेखील हाऊसफुल्ल झाले आहेत. काही ठिकाणी चाहत्यांकडून चित्रपटाच्या पोस्टरला दुधाने अभिषेक घालण्यात येत आहे.
तुमच्या प्रेमामुळे ‘छावा’ खऱ्या अर्थाने जिवंत झाला, विकीने मानले प्रेक्षकांचे आभार
चित्रपटाला मिळणारे भरभरून प्रेम पाहून विकी काwशल भावुक झाला आहे. ‘तुमच्या प्रेमामुळे आज ‘छावा’ खऱया अर्थाने जिवंत झाला,’ असे त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले. तसेच प्रेक्षकांचे मेसेज, फोन, व्हिडीओ, चित्रपट पाहताना आलेले अनुभव या सगळय़ा गोष्टी पाहून मी भारावून गेलो आहे. सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांची शौर्यगाथा चित्रपटगृहांमध्ये जाऊन अनुभवल्याबद्दल सर्वांचे आभार, अशी भावना विकीने पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली.