‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारच्या नाकीनऊ आले, भुजबळांची कबुली; आनंदाचा शिधाही आता बंद

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर विभागांना आर्थिक फटका बसत आहे, पुरेसा निधी मिळणेच कठीण होऊन बसलेय, सरकारच्या नाकीनऊ आलेत, अशी जाहीर कबुली अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली.

छगन भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘लाडकी बहीण’ योजनेवर होणाऱ्या खर्चाबद्दल चिंता व्यक्त केली. ‘लाडकी बहीण’ योजना 35-40 कोटींवर जाते. या एकाच योजनेसाठी इतके पैसा काढले की, त्याचा परिणाम अन्य विभागांच्या निधीवर होतो, असे भुजबळ म्हणाले.

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर सरकारी योजनांना निधी देताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तिथेही मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागणार आहे, असे भुजबळ पुढे म्हणाले.

अर्थखात्याला निधी देणे शक्य नाही

शिवभोजन थाळीच्या निधीबाबतही छगन भुजबळ यांनी भाष्य केले. या योजनेसाठी निधी मिळवताना फार जास्त प्रयत्न करावे लागतात, या योजनेचा पूर्ण निधी अजून मिळालेला नाही, असे ते म्हणाले. सणासुदीला दिला जाणारा आनंदाचा शिधाही येत्या दिवाळीत मिळणार नाही. कारण अर्थखात्याने या वेळी निधी देणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. एका वेळी आनंदाचा शिधा द्यायचा झाला तर त्यासाठी 350 कोटी रुपये लागतात असे ते म्हणाले.