सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनाने देशाची अपरिमित हानी; छगन भुजबळ यांनी व्यक्त केला शोक

हिंदुस्थानी लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेल्या निधनाबाबत अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे.

हिंदुस्थानी लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे बुधवारी लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेत दु:खद निधन झाले. या अपघातात त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचेसह एकूण 13 लष्करी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निधन झाले. ही देशासाठी अतिशय दु:खद घटना आहे. सीडीएस बिपिन रावत यांनी आपल्या आयुष्यातील 37 वर्षे लष्करासाठी समर्पित केली. ते देशातील पहिले सीडीएस अधिकारी होते. देशातील संरक्षणाच्या अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्या. देशाच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी ते एक होते. बिपीन रावत यांनी केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सेवा दिली आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा विविध पुरस्कारांनी सन्मान देखील करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने देशाची अपरिमित अशी हानी झाली असून देशाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय रावत तसेच अपघातात निधन झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे.