
ओबीसी समाजाने कधीही मराठा समाजाचा विरोध केला नाही. ओबीसी आणि मराठा समाजात दुही निर्माण करण्याचे काम आंतरवाली सराटीतून झाले. भाजपचे १३५ आमदार ओबीसींच्या मतांवरच निवडून आले आहेत. पण भाजपने ओबीसींना कायम गृहीत धरू नये, हा ‘डीएनए’ कधीही सरकू शकतो, असा इशाराच मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. राधाकृष्ण विखे यांनी राज्यात विखार पसरवण्याचे काम केले, असा आरोपही भुजबळ यांनी केला.
बीड येथे शुक्रवारी ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ, आमदार धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, अब्बास अन्सार, मनोहर धोंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा नामोल्लेख घेतलेल्या न करता फडणवीस सरकारने हैदराबाद गॅझेटच्या निर्णयावर कडाडून टीका केली. ओबीसी आरक्षण जाण्याच्या भीतीने पंधरा जणांनी आत्महत्या केली. परंतु सरकारकडे त्यांना मदत देण्यासाठी खडकू नाही. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु ओबीसी आणि मराठा समाजात दुही निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. आंतरवाली सराटीतून त्याला खतपाणी घालण्यात येत आहे. मुंबईतील आंदोलनाच्या दहशतीपोटी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. हा अध्यादेश ओबीसींवर अन्याय करणारा आहे, त्यामुळे तो मागेच घेतला पाहिजे. राधाकृष्ण विखे हे आंतरवाली सराटीला कशासाठी आले होते? विखे यांनी राज्यात विष पेरण्याचे काम केले असा आरोपही भुजबळ यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी हा भाजपचा डीएनए असल्याचे म्हटले होते. सरकारने मराठा आरक्षणाच्या नावाखाली चाललेला सावळा गोंधळ थांबवला पाहिजे नाहीतर हा डीएनए केव्हा त्यांच्यापासून सरकेल सांगता येणार नाही, असा सूचक इशाराही छगन भुजबळ यांनी दिला.
वड्डेटीवारांच्या भूमिकेवर भुजबळांचा संशय
भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले, बीडच्या ओबीसी मेळाव्यामध्ये तुम्ही या असे वड्डेटीवारांना निमंत्रण दिले मात्र ते आले नाही. काही पत्रकार मित्रांनी मला प्रतिप्रश्न केला. तुम्ही नागपूरच्या मेळाव्यात का गेला नाही. तर मी त्यांना लावरे तो व्हिडिओ म्हणत विजय वड्डेटीवारांचा व्हिडिओ दाखवला. विजय वड्डेटीवार एकच मुद्दा घेवून चालत नाहीत तर वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. तासा तासाला भूमिका बदलणे योग्य नाही. मी कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधला गेलेलो नाही असेही भुजबळ म्हणाले.
जरांगे मराठ्यांना फसवत आहेत – धनंजय मुंडेंचा हल्लाबोल
मनोज जरांगे पाटील समाजा दरी निर्माण करत आहेत. मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करत आहेत. भुजबळांना आणि आम्हाला तर कुठंच सोडलं नाही. हा माणूस खऱ्या अर्थाने मराठा समाजाला फसवत आहे. मराठा समाजातील मुलांच्या शिक्षण आणि नोकरीसाठी नव्हे तर राजकारणासाठी या माणसाला ओबीसी आरक्षणात यायचे आहे, असा आरोप आमदार धनंजय मुंडे यांनी केला.
चौथी नापास माणसाचे ऐकून सरकारने पाप केले – हाके
हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा अध्यादेश हा ओबीसी आरक्षण संपवणारा असल्याचा स्पष्ट आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. सरकारने आधी मागासवर्ग आयोग बरखास्त करावा अशी मागणीही त्यांनी केली. राज्य सरकारने काढलेला जीआर न्यायालयाचा अवमान करणारा आहे. मुख्यमंत्र्यांना शिव्या देणारा हा चौथी नापास माणूस आहे, मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे. सरकारने त्या माणसाचे ऐकून पाप केले आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाओ कार्यक्रम नाही असे म्हणणाऱ्या हरी नरके यांची आठवण येते असे हाके म्हणाले.