राज ठाकरे यांचेही स्वप्न उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले – छगन भुजबळ

1939
chhagan-bhujbal

‘मनसेप्रमुख राज ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवत असताना त्यांना सतत विचारलं जायचं की तुम्ही निवडणूक का लढवत आहात? तेव्हा ते म्हणायचे राज्याला मजबूत विरोधी पक्ष देण्यासाठी निवडणूक लढतोय. राज ठाकरेंनी जी इच्छा व्यक्त केली होती त्या इच्छेला न्याय देण्याचे काम त्यांच्या मोठ्या बंधूंनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्याला मजबूत विरोधी पक्ष दिलेला आहे’, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे खूप हुशार आहेत. मात्र मला त्यांची भीती वाटते. कारण ते एका रात्रीत काय करतील त्याचा काहीही भरोसा नाही. विरोधी पक्षनेते म्हणून चांगले काम करण्याच्या फडणवीस यांना मी शुभेच्छा देतो. मात्र आता तरी त्यांनी रात्रीचे खेळ बंद करावेत’, असा सूचक इशारा देतानाच छगन भुजबळ यांनी भाजपच्या एका रात्रीत हालाचाली करून शपथविधी करण्याच्या कृतीवर निशाणा साधला. ‘देवेंद्र फडणवीसांना एकनाथ खडसेंचं नाव घेऊन भुजबळांनी डिवचले. जेव्हा एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते तेव्हा ते हळूच एखादा कागद फडणवीस यांना देऊन त्यांना बोलायची संधी द्यायचे. ज्याप्रमाणे खडसेंनी तुम्हाला तयार केले त्याप्रमाणे आता फडणवीसांनी मागच्यांना तयार करावे. मागच्या बाकावर बसणार्‍यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करावा’, असा सल्लाही भुजबळांनी यावेळी फडणवीसांना दिला.

आपली प्रतिक्रिया द्या