
छटपूजेकरिता गेलेले दोघेजण बुडाल्याची घटना मालाडच्या मार्वे बीचवर रविवारी घडली. अजय चौहान हा मृत झाला असून त्याला वाचवण्यासाठी गेलेला मुकुल साह अद्याप बेपत्ता आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
छटपूजेकरिता दरवषी मार्वे बीचवर मोठय़ा प्रमाणात महिला येत असतात. आज सकाळी मालाड येथे राहणारे अजय आणि मुकुल हे दोघे त्याच्या पालकासोबत आले होते. अजय हा पाण्यात खेळत होता. त्याचा पाय घसरल्याने तो खाली पडला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो आत ओढला गेला. अजय बुडत असल्याचे मुकुलने पहिले. त्याला वाचवण्यासाठी मुकुलने पाण्यात उडी मारली. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले.
अग्निशमन दल आणि स्थानिक जीवरक्षकांनी काही अंतरावरून अजयला पाण्याबाहेर काढले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अग्निशन दल आणि स्थानिक मच्छीमार हे रात्री उशिरापर्यंत मुकुलचा शोध घेत होते.

























































