
छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यात ‘वेदांता’च्या वीजनिर्मिती प्रकल्पात आज बॉयलरचा भीषण स्फोट झाला. त्यात 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 40 कामगार जखमी झाले आहेत. जखमींपैकी 12 जणांची प्रकृती चिंताजनक असून ते जवळपास 80 टक्के भाजले आहेत.
मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास अचानक बॉयलरचा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 कामगारांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. जखमी झालेल्या 40 कामगारांपैकी 18 गंभीर जखमींना रायगढ येथील जिंदल फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट झाला त्यावेळी अनेक मजूर बॉयलरच्या जवळपास काम करत होते. त्यामुळे जखमींचा आकडा वाढला.
स्फोट एवढा भीषण होता की, काही किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू केला. स्फोटानंतर कारखान्यात खळबळ उडाली. सर्व कामगार व इतर कर्मचारी घाबरून जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटले. त्या पळापळीत अनेक कामगार जखमी झाले. स्फोट झाल्यानंतर काही मजूर मलब्याखाली दबल्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी सांगितले, की घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
चौकशी सुरू, जखमींना चांगले उपचार देण्यास प्राधान्य
पंपनीच्या व्यवस्थानाने सांगितले की, बॉयलरचे संचलन आणि देखभाल एनटीपीसी जीई पॉवर सर्व्हिस लिमिटेड या पंपनीकडे होते. घटनेची चौकशी करण्यात येत आहे. आता सर्वप्रथम जखमींना चांगले उपचार देणे ही आमची प्राथमिकता असून त्यासाठी आम्ही काम करत आहोत.
कारखान्याबाहेर कामगारांच्या नातेवाईकांचा आक्रोश
स्फोटाबाबत माहिती मिळताच कामगारांचे नातेवाईक वीज प्रकल्पावर धडकले, मात्र त्यांना आतमध्ये जाऊ दिले नाही. त्यामुळे नातेवाईकांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोरच बसून आंदोलन सुरू केले.
अनेक मजूर पश्चिम बंगालचे
वीजनिर्मिती प्रकल्पात अनेक मजूर पश्चिम बंगालमधून आणण्यात आले होते. एका ठेकेदाराने त्यांना कामावर ठेवले होते. या पंपनीच्या पर्यवेक्षकाने सांगितले की, बॉयलर-1 मध्ये स्फोट झाला त्यावेळी आम्ही पेंटिंगचे काम करत होतो.



























































