
खरी तुकडे तुकडे गँग दिल्लीमध्ये बसलेली असून त्यांनी आधी देशाच्या अर्थव्यवस्थेचे तुकडे केले. नोटाबंदी, जीएसटी लागू करून देशाचे अर्थकारण उद्ध्वस्त केले. दोन कोटी नोकर्या देऊ, काळे धन आणू, 15 लाख बँक खात्यात जमा करू, अच्छे दिन आणू या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या खोटारडेपणावर पडदा टाकण्यासाठी सीएए, एनआरसी, एनपीआर हा भाजपचा अजेंडा पुढे केला जातोय. त्याविरोधात देशभर असंतोष आहे. तो असंतोष दडपाल तर हातात तिरंगा घेऊन लढू आणि जिंकू असा निर्धार उमर खालिद याने रविवारी व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे छात्र भारती आणि समविचारी विद्यार्थी संघटनांनी सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधी छात्र परिषद आयोजित केली होती त्यावेळी तो बोलत होता. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सीएए, एनआरसी, एनपीआर लागू होणार नाही असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न राहणार आहे. या परिषदेत लोकभारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील, अलिगढ विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सलमान इम्तियाज, हरयाणाचे युवा नेते प्रदीप नरवाल, टीस विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष भट्टा राम, जेएनयूचे विद्यार्थी नेता रामा नागा, छात्रभारतीचे राज्य अध्यक्ष प्रा. रवींद्र मेढे यांनी सहभाग घेतला होता. या परिषदेचे स्वागताध्यक्ष फारुक शेख होते, अशी माहिती परिषदेचे निमंत्रक सचिन बनसोडे यांनी दिली.



























































