
दिवसरात्र हिंदुत्वाचा गजर करणाऱ्या फडणवीस सरकारच्या काळात देवही सुरक्षित राहिलेले नाहीत. पद्मपुरा भागात रस्त्यावर असलेल्या हनुमान मंदिरात चोरट्याने छन्नी-हातोड्याचे घाव घालून मूर्तीचे डोळे काढले. मूर्तीच्या भालप्रदेशावरील सोन्याचा पत्रा, त्रिशूळ, चांदीच्या भुवयाही चोरट्याने खरवडून काढल्या. शनिवारी पहाटे साडेतीन वाजता घडलेला हा संतापजनक प्रकार मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
छावणी परिसर हा शहरातील सर्वाधिक सुरक्षित परिसर म्हणून ओळखला जातो. अलिकडच्या काळात छावणी पोलिसांच्या कर्तबगारीला मिंधेगिरीचा गंज चढल्याने गुन्हेगारीत वाढ झाली आहे. परिसरात आता पोलिसांचेच घर सुरक्षित राहिले नाही. रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हनुमान मंदिरात चोरी झाल्याचे सकाळी पाच वाजता साफसफाईचे काम करणाऱ्या लक्ष्मीबाई चक्रावार यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ संजय बारवाल यांना ही घटना सांगितली.
हनुमान मंदिरात चोरी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. संजय बारवाल हे मंदिरात आले. त्यावेळी हनुमान मूर्तीचे डोळे, त्रिशूळ तसेच इतर दागिने गायब असल्याचे आढळले. मंदिरात ठेवण्यात आलेली दानपेटी, कपाटातील रोकडही चोरट्यांनी लंपास केली. एकूण २.८२ लाखांवर चोरट्यांनी डल्ला मारला. या प्रकरणी संजय बारवाल यांच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती मिळताच संजय बारवाल यांनी मंदिरात धाव घेतली असता चोरट्यांनी मंदिरातील दहा हजार रुपये किमतीचा सोन्याच्या पत्र्याचा टिळा, ५ हजार रुपये किमतीचे चांदीच्या भुवया, १५ हजार रुपये किमतीचे पायातले कडे, २ हजार रुपये किमतीचे कपाळावरील चांदीचे त्रिशळ आणि अडीच लाख रुपयांची दानपेटीतील कपाटातील रोकड असा एकूण २ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी संजय बारवाल यांच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीने टिपले
शनिवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान टोपी आणि जॅकेट घातलेले चार चोरटे गेट तोडून बुटासह मंदिरात शिरले. त्यांनी सुरवातीला मंदिरातील काचेचा दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यानंतर कपाटातील अडीच लाख रुपये काढले. त्यानंतर छन्नी-हातोड्याने मूर्तीवर लावण्यात आलेले सोन्या-चांदीचे दागिने ओरबाडन काढले.


























































