सावे, कराड यांचा फोटो फाडला; गाडीला घेराव, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपातील नाराज इच्छुकांचा सलग दुसऱ्या दिवशीही राडा

छत्रपती संभाजीनगर येथे सलग दुसऱ्या दिवशी भाजपातील नाराज इच्छुकांचा उद्रेक पाहायला मिळाला. भाजप कार्यालयात काल राडा घातलेल्या ‘लाडक्या बहिणी’ आज थेट उपोषणाला बसल्या. तर दुसरीकडे नाराज भाजप पदाधिकाऱ्यांनी खासदार भाजप कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घालत काळे फासले. यावेळी त्यांच्याविरोधात तुफान घोषणाबाजी करण्यात आली.

बुधवारी सकाळीच भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी कार्यालयावर धडक दिली. खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांना नाराज कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. कार्यकर्त्यांनी भागवत कराड यांच्या गाडीला घेराव घालत रोखले. त्यानंतर त्यांच्या गाडीच्या बोनेटवर जोरजोरात हात आपटत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. अतुल सावे यांच्याही गाडीला घेराव घालण्यात आला होता. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवले आणि सावे, कराड यांनी तिथून पळ काढला.

भाजपमध्ये आलेल्या उपऱ्यांना तिकीट देण्यात आल्याने निष्ठावंतांमध्ये संतापाची लाट उसळली. आम्ही पक्ष वाढवला. गुन्हे अंगावर घेतले. आमच्या निष्ठेची माती करण्यात आली, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. तसेच 50 टक्के महिलांना तिकीट देण्यात आल्याचा दावाही फेटाळून लावला.

काम करणाऱ्या फक्त 5 टक्के महिलांना तिकीट देण्यात आले. बाकी 45 टक्के कार्यकर्त्यांच्या बायकांना तिकीट दिले. ज्यांना कधी पाहिलेही नाही त्यांना तिकीट दिले आणि त्यांना आम्ही पाडणार आहोत. आमच्यावर अन्याय झाला आहे. अन्याय सहन करणार नाही, असा संताप भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

अतुल सावे भाजपच्या जीवावर मंत्री झाले. भागवत कराड खासदार झाले. पण ते तिकीट वाटपात जातीवाद करत आहेत. सावेंच्या पीएला तिकीट देण्यात आले. पण आमचे तिकीट कापले, असा आरोपही यावेळी करण्यात आला.

दरम्यान, नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे काम भाजप आमदार संजय केणेकर यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर संजय केनेकर यांनी नाराज प्रशांत बदाने पाटील यांना गाडीत टाकून पळवून नेले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी नाकारल्याने लाडक्या बहिणींचा थयथयाट! नाराजांचा रुद्रावतार पाहून भाजप मंत्री, खासदार मागच्या दाराने पळाले