
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले संभाजीराजे छत्रपती यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणप्रश्नावर दोन दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन बोलवा, सारथी संस्थेला निधी द्या, सर्वेच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करा अशा मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या आणि मराठा आरक्षणाबाबत ठाम भूमिका घेण्यासाठी सरकारला 6 जूनचा अल्टिमेटम दिला.
मराठा आरक्षण प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती हे राज्यभरातील सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणता राजकीय अजेंडा घेऊन अजिबात आलेलो नाही. आमची एकच मागणी आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा. 2007 सालापासून मी महाराष्ट्र पिंजून काढला कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात मराठा समाजावर अन्याय होतोय यासाठी माझा हा लढा आहे. मी स्वतः 5 मे रोजी निकाल लागला तेव्हा सगळ्यांना शांत ठेवलं. नाहीतर महाराष्ट्र पेटला असता, पण आम्ही किती शांत बसायचं, असा सवाल त्यांनी केला.
आता आमदार, खासदारांची ही जबाबदारी
आम्हाला समाजाला आम्हाला वेठीला धरायचं नाही. आता ही लोकांची जबाबदारी नाही, तर या सगळ्या खासदार, आमदार, मंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद इथल्या सर्वांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे संभाजीराजे म्हणाले.
नाहीतर सांगा आम्हाला मराठा समाजाची मते नकोत!
मराठा समाजाच्या प्रश्नावर दोन दिवसांचं अधिवेशन बोलवावं. अधिवेशनात आरोप-प्रत्यारोप करायचे नसून समाजाच्या भल्यासाठी काम करा. आम्ही वर गॅलरीत बसून त्यावर लक्ष ठेऊ. नाहीतर सांगून टाका की या माराठा समाजाचं आम्हाला मतदानच नको आहे. धाडस असेल तर सांगून बघा असं. मग बघतो आम्ही काय करायचं ते, असे आव्हानदेखील त्यांनी सर्व पक्षांना दिले.
मराठा आरक्षणासाठी सुचवलेले तीन पर्याय
- संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर तीन पर्याय सुचवले. केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी एकत्रपणे यासाठी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.
- राज्य सरकारने रिव्ह्यु पिटिशन फाईल करावी. ती फुलप्रूफ पिटीशन हवी. हे राज्य सरकारने करावं.
- रिव्ह्यु पिटिशन टिकली नाही तर क्युरेटिव्ह पिटिशनचा दुसरा पर्याय आहे. जो अपवादात्मक परिस्थितीत करायचा असतो. पण राज्य सरकारला पूर्ण तयारीनिशी पिटिशन करावी लागेल.
- कलम 342 अ च्या माध्यमातून राज्य सरकार राज्यपालांच्या माध्यमातून प्रस्ताव केंद्र सरकारला देऊ शकतं. यासाठी गायकवाड समितीच्या अहवालातील त्रुटी दूर कराव्या लागतील. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाईल, तिथून ते केंद्रीय मागास वर्गीय आयोगाकडे जाईल. तिथून ते केंद्रीय मंत्रिमंडळाकडे जाईल. त्यात 5 ते 6 महिने जातील.
मागण्या
- राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवा
- सारथी संस्थेला हजार कोटींचा निधी द्या
- मराठा समाजासाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन करा
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची प्रकल्प मर्यादा 25 लाख करा
- मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी
- 9 सप्टेंबर 2020 पूर्वी ज्या मराठा तरुणांची सरकारी नोकरती निवड झाली त्यांना तत्काळ नियुक्ती द्यावी.
ओबीसीमध्ये नवा प्रवर्ग निर्माण होऊ शकतो का?
अनेक लोकांची इच्छा आहे की आपण ओबीसीमध्ये जावं. त्यासाठी सगळ्यांना आपापलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर नेहमी हा विषय मांडतात. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड देखील हा विषय मांडतात. पण ओबीसींमध्ये नवा प्रवर्ग निर्माण करून देता येऊ शकतो का? हे मी नाही सांगणार. सरकारने सांगायचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगायचं, पूर्वीच्या सरकारने सांगावं, देवेंद्र फडणवीसांनी सांगावं, असा सवाल त्यांनी केला.
दिल्लीत मराठा समाजाची गोलमेज परिषद
राजधानी दिल्लीमध्ये 9 ऑगस्ट रोजी मराठा समाजाची पहिली गोलमेज परिषद होणार, अशी घोषणा यावेळी खासदार संभाजीराजे यांनी केली. त्यासाठी महाराष्ट्राच्या सर्व आमदार-खासदारांना, मुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्षनेत्यांना मी स्वतः आमंत्रण देणार आहे. ही परिषद कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाहीये, असे त्यांनी स्पष्ट केले.
6 जूनपर्यंत योग्य ती कार्यवाही केली नाही आणि अॅक्शन प्लान ठरवला नाही तर आम्ही कोविड बिविड काही बघणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जून या राज्याभिषेकदिनी रायगडावरूनच आंदोलनाची भूमिका जाहीर करू.































































