
दिग्गजांच्या सभांनी गाजलेले आणि सांस्कृतिक-राजकीय वारसा लाभलेले दादर पश्चिम येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदान आकर्षक रोषणाईने उजळले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीमधून झालेले हे काम आहे. मैदानातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, राज्याभिषेक शिल्प आणि माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यालाही विविधरंगी रोषणाई करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज मैदान स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक राजकीय मेळाव्यांचे साक्षीदार राहिले आहे. हे मैदान 28 एकर परिसरात पसरले असून त्याचा बाह्य परिघ सुमारे 1.2 किमी आहे. या मैदानाच्या फुटपाथवर आकर्षक रोषणाई करण्यासाठी आवश्यक असणारा निधी वापरण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र पालिकेला प्राप्त झाल्यानंतर पालिकेच्या जी/उत्तर विभागाकडून या प्रकल्पाचे काम करण्यात आले. ही रोषणाई कायमस्वरूपी आहे. पुतळ्याच्या पदपीठावर विविध रंग बदलणारे एल.ई.डी. वॉल वॉशर दिवे लावले आहेत. ही रोषणाई स्वयंचलित व विविधरंगी म्हणजे रंग बदलत्या स्वरुपाची आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये खर्चातून हा प्रकल्प साकारला आहे. यामध्ये 5 वर्षांचा परिरक्षण खर्चदेखील समाविष्ट आहे. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे, सभागृह नेत्या विशाखा राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी मान्यवर उपस्थित होते.































































