धूळमुक्त हिरवेगार मैदान, वॉकिंग ट्रॅक, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचा कायापालट!

दिग्गजांच्या सभांनी गाजलेले आणि सांस्कृतिक-राजकीय वारसा असणाऱया दादर पश्चिम येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचा लवकरच कायापालट होणार आहे. पालिकेच्या माध्यमातून मैदानाच्या नूतनीकरणात हिरवेगार नैसर्गिक गवत बहरणार असून दर्जेदार वॉकिंग ट्रकही बनवला जाणार आहे. शिवाय या ठिकाणच्या 100 वर्षांपूर्वीच्या हेरिटेज प्याऊचे नूतनीकरण करून पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दररोज शेकडो खेळाडू खेळण्यासाठी येतात. या ठिकाणी सात क्रिकेट पीच आहेत. हे मैदान 25 एकर परिसरात पसरले आहे. क्रिकेट पीचसभोवतालचा काही भाग सोडल्यास मैदानावर गवत नसल्याने परिसरात मोठय़ा प्रमाणात धूळ पसरते. त्यामुळे पालिकेने संपूर्ण मैदानावर गवत आणि पाण्याचा फवारा नियमितपणे करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नूतनीकरणाचे कामही करण्यात येणार आहे. यासाठी पालिका 4.7 कोटी रुपये खर्च करणार आहे. मार्चमध्येच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

पक्ष्यांना आकर्षित करणारी झाडे लावणार
मैदानाच्या नूतनीकरणाच्या फेज-1 चे काम मार्चमध्ये सुरू होणार असून संपूर्ण मैदानाची एक लेव्हल करण्यात येणार आहे तर फेज-2 मध्ये या ठिकाणी पक्ष्यांना आकर्षित करणारी झाडे लावण्यात येणार आहेत. शिवाय खेळाडूंच्या सोयीसाठी रेस्ट रूम, चेंजिंग रूम अशा अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण करून देण्यात येणार आहेत. फेज-1 चे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पाच ठिकाणी 35 रिंग वेल,रेन वॉटर हार्वेस्टिंग
z मैदानावर पाणी फवारण्यासाठी या ठिकाणी 40 हजार लिटर पाणी उपलब्ध आहे. तर आणखी एक 20 हजार लिटरची टाकी मिळून 60 हजार लिटर पाणी मिळू शकते. मात्र फवारण्यासाठी सुमारे 2 लाख 40 हजार लिटर पाणी कमी पडते.

z त्यामुळे पाण्याची गरज भागवण्यासाठी या ठिकाणी पाच ठिकाणी 35 रिंग वेल (छोटय़ा विहिरी) तयार करण्यात येणार आहेत. शिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. हे पाणी या टाक्यांमध्ये सोडले जाईल. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाण्याची फवारणी असा दुहेरी उपयोग होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या