
फुलांच्या पाकळ्या, रंगीबेरंगी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघडय़ा.. आकर्षक विद्युत रोषणाई, वाटेत पुष्पवृष्टी… सोबत पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती ताराराणी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या अखंड जयघोषात, सळसळत्या उत्साहात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांचा शाही लवाजम्यासह निघालेला रथोत्सव सोहळा अभूतपूर्व उत्साहात पार पडला.
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार, युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांसह पालकमंत्री सतेज पाटील यांनीही रथ ओढला. पारंपरिक लवाजम्यासह शिवशाहूप्रेमींनी हा रथ ओढून मार्गस्थ केला. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने हा अविस्मरणीय रथोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा अभिमान आणि त्यांच्या कार्याचा वारसा आपल्या प्रजेतही रुजावा व वाढावा, यासाठी छत्रपती शिवराय आणि करवीर गादी संस्थापिका रणरागिनी छत्रपती महाराणी ताराराणी या देवतुल्य व्यक्तिमत्त्वांच्या समारंभांना धार्मिक उत्सवाचे स्वरूप देऊन 1914 साली राजर्षी शाहू महाराजांनी हा रथोत्सव सुरू केला. दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर दुसऱया दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव होतो, तर दुसऱया दिवशी छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव सुरू करण्यात आला आहे.























































