ना बँड, ना बारात लग्नासाठी नवरदेव एकटाच निघाला बाईकवरून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात लग्न सोहळ्यांसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि आपल्या लग्नात कसलेही विघ्न येऊ नयेत यासाठी झारखंडमधील एक नवरदेव चक्क एकटाच बाईकवरून लग्नासाठी वधूच्या घरी पोहोचला आहे. पाहुणे मंडळी सोडाच अगदी कुटुंबीयदेखील लग्नसोहळ्यात आले नव्हते.

छत्तीसगडच्या बलरामपूर येथील ही घटना आहे. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी अडवून विचारपूस केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा युवक आपल्या लग्नासाठी वराचा पोशाख चढवून एकटाच दुचाकीवरून लग्नासाठी निघाला होता. या युवकाचे सणावल या ठिकाणी लग्न होणार होते. पण निर्बंधामुळे लग्नाची वरात काढणे शक्य नसल्याने त्याने वऱहाडींशिवाय एकटेच लग्नाला जाण्याचा निर्णय घेतला. ही कहाणी ऐकून पोलिसांनाच दया आली. त्यांनी त्याला लग्नासाठी पाच जणांना घेऊन जाण्याचा सल्ला दिला. परंतु नवऱयाने तो सल्ला नाकारला.

‘‘संसर्गाच्या भीतीने गावातील लोक वरातीत सामील होणार नाहीत. अशा स्थितीत त्यांना जबरदस्तीने लग्नात कसे आणू,’’ असे नवरदेव म्हणाला. शेवटी तो एकटाच लग्नासाठी निघून गेला. नाकाबंदीदरम्यान पोलीस आणि युवकाच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत असून नियमांचे पालन केल्यामुळे नेटिझन्स या युवकाचे काैतुक करत आहेत.